बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल आज (बुधवार) शिवसेनेत दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेत जाणार असल्याची जाहीऱ घोषणा केली होती. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.

राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रातच हादरे बसू लागले आहेत. मागील काही दिवसात राष्ट्रवादीचे वजनदार नेते पक्ष सोडून गेले आहेत. त्यात आमदार दिलीप सोपल यांचीही भर पडली आहे. सोमवारी बार्शीत स्वतःच्या निवासस्थानी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार सोपल यांनी केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी मतदार संघातील परिस्थिती पाहून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले होते.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीकडे आमदार दिलीप सोपल यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे सोपल पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. युतीच्या जागा वाटप सूत्रानुसार, बार्शी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे येते. सोपल यांचे विरोधक असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेतून भाजपात उडी घेतल्याने सोपल यांना मार्ग मोकळा झाला होता.

यापूर्वी करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राणाजगजितसिंह पाटील आणि साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपामध्ये दाखल झाले आहेत.

Story img Loader