अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळीवर परिणामाची शक्यता

मुंबई : अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सुकामेव्याच्या मिठायांच्या किमतीही वाढणार आहेत.

अफगाणिस्तानातून प्रामुख्याने जर्दाळू, अंजीर, छोटे पिस्ते आणि अक्रोडचा पुरवठा भारतासह इतर देशांना होतो. साधारण: ऑगस्टअखेर, सप्टेंबरमध्ये नवे पीक हाती येते. त्यावेळी भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सुकामेव्याची खरेदी होते. मात्र, सध्या अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे सुकामेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सणासुदीच्या दिवसांत सुकामेवा आणि त्यापासून बनवलेल्या मिठायांना भारतात मोठी मागणी असते. मात्र, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास या कालावधीत किमती वाढण्याची शक्यता आहे.

हिंग आणि शहाजिरेही अफगाणिस्तानातून

स्वयंपाकात वापरण्यात येणारे हिंग तयार करण्यासाठीचे मूळ साहित्य आणि शहाजिरे याचाही पुरवठा अफगाणिस्तानातून होतो. मात्र, त्याची मागणी आणि वापर तुलनेने मर्यादित असतो. मात्र, या पदार्थांचा पुरवठा आणि किमतींवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

खरेदी किती?

अफगाणिस्तानमधून सुमारे ३८ हजार टन सुकामेव्याची भारतात आयात होते. गेल्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) भारताने ३७५३.४७ कोटींचा माल अफगाणिस्तानातून आयात केला. त्यापैकी २३८९ कोटी रुपये सुकामेव्यासाठी होते.