महाराष्ट्रात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईसह अनेक जिल्ह्यात पट्रोलने शंभरी पार केली आहे. सलग होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांच्या फरकाने देशात इंधनाचे दर वाढविले जात आहेत. आज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ केली आहे. मंगळवारी पेट्रोल २३ आणि डिझेल २७ पैसे महाग झाले होते. विरोधकांनी पट्रोलने दरवाढीवरून मोदी सरकारला घेरले आहे. सोशल मिडियावर नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

आधीच करोना महामारीचे संकट आणि आता महागाईचे संकट येऊन ठेपले आहे. दरम्याना राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी ‘आपल्या नशीबामुळे देशात पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत तर जनतेसाठी चांगलंच आहे,’ असे म्हणाले होते. २०१५ मधील एका रॅलीतील हा व्हिडिओ आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. “आपल्या नशीबामुळे देशात पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत तर जनतेसाठी चांगलंच आहे, असं पंतप्रधान २०१५ मध्ये जाहीर भाषणात सांगत होते. आता २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे, आता कुणाचं नशीब म्हणायचं प्रधानमंत्री महोदय?”, असा खोचक प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे.

पंतप्रधान मोदींच्या नशीबाने जर पेट्रोलचे दर कमी होतात, तर मग आता पेट्रोलने शंभरी कशी गाठली याचे उत्तर नशीबवान मोदींनी द्यावे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा – हेलिपॅडपासून रस्त्यांपर्यंत… योगींनी जिथे जिथे पावलं ठेवली तिथे ‘त्याने’ शिंपडलं गंगाजल

‘माझ्या नशिबानं जर पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत. लोकांच्या खिशात पैसा येतो आहे, तर मग कमनशिबी लोकांना सत्तेवर आणायचंच कशाला?,’ असं मोदींनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यावर ‘बदनसीब जनता’, असे ट्विट मलिक यांनी केले आहे.

आणखी वाचा – अबकी बार… मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोलच शतक!

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोलच शतक!

मे महिन्यात आतापर्यंत एकूण १५ दिवस इंधन दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. या महिन्याच्या वाढीनंतर पेट्रोल ३.३३ रुपयांनी महाग झाले आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ३.८५ रुपयांनी महाग झाले आहे. एप्रिलमध्ये इंधनाचे दर काही प्रमाणात कमी करण्यात आले होते. त्यानंतर दर वाढविण्यात आले. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०० च्या पलीकडे विकले जात आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देखील पेट्रोल शंभरीपार गेले आहे. गोरगावात पेट्रोल १००.०४ प्रति लिटर दराने विकल्या जात आहे.

राज्यात या १५ जिल्ह्यांनी गाठली शंभरी

मुंबईपुर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोल शंभरीपार गेले आहे. यामध्ये अमरावती १००.४९, औरंगाबाद  १००.९५, भंडारा १००.२२, बुलडाणा १००.२९, गोंदिया १००.९४, हिंगोली १००.६९, जळगाव १००.८६, जालना १००.९८, नंदूरबार १००.४५, उस्मानाबाद १००.१५, रत्नागिरी १००.५३, सातारा १००.१२, सोलापूर १००.१०, वर्धा १००, वाशिम १००.३४, या जिल्ह्यात पेट्रोल दरवाढ झाली आहे.

काय आहेत आजचे दर

आज झालेल्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ९३.६८ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेल ८४.६१ प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९९.९४ रुपये आहे तर डिझेल ९३.६८ रुपये प्रति लिटर विकले जात आहेत. गोरेगावमध्ये तर पेट्रोल शंभरीपार गेले आहे. गोरेगावात पेट्रोल १००.०४ प्रति लिटर दराने विकल्या जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९५.२८ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८९.३९ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर ९३.७२ आणि डिझेलची किंमत ८७.४६ रुपये प्रतिलिटर झाली आहे.