करोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर कामाचा ताण वाढ आहे. करोनाबाधितांसोबतच डॉक्टरांना अन्य रुग्णांकडेदेखील जातीने लक्ष द्यावं लागत आहे. मात्र या कठीण प्रसंगातही डॉक्टर त्यांचं कार्य चोख पार पाडत आहे. मीरारोड येथील वोक्हार्ड येथील रुग्णालयामध्ये दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. खेळण्याच्या नादात एका चिमुकल्याने नाणे गिळले होते. तर एका लहान मुलीने लोखंडाचा लहान तुकडा नाकात घातला होता.
मीरा रोड येथील वोक्हार्ड रुग्णालयात काही दिवसापूर्वी दोन लहान मुलांना उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. यापैकी एक लहान मुलगा रियानने घरात खेळत असताना जमिनीवर पडलेले नाणे गिळले. तर दुसऱ्या एका प्रकरणात अमरिता या लहान मुलीने लोखंडाचा एक तुकडा नाकात घातला, हा तुकडा नाकात अडकल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला रुग्णालयात आणण्यात आलं. या दोघांवरही रूग्णालयातील नाक-कान-घसा शल्यचिकित्सक आणि सल्लागार डॉ. नीपा वेलिमुत्तम आणि त्यांच्या टीमने दुर्बिणीच्या सहाय्याने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली आहे.
‘‘काही दिवसांपूर्वी या मुलाने घरी खेळताना जमिनीवर पडलेले एक रूपयांचे नाणं चुकून गिळले. मुलाने नाणं खाल्ल्याचं लक्षात आल्यावर आई-वडिलांनी त्याला तातडीने वोक्हार्ड रूग्णालयातील आपत्कालीन विभागात आणलं. याठिकाणी रियानचा एक्स-रे काढला आणि उपचार सुरू केले. वैद्यकीय अहवालानुसार, गिळलेलं नाणं रियानची श्वसननलिका आणि अन्ननलिकेच्या मधोमध अडकली होती. नाणं अडकल्याने त्याला श्वास घेताना त्रास जाणवत होता. हे पाहून या मुलाला तातडीने शस्त्रक्रिया विभागात हलवण्यात आले आणि एन्डोस्कोपीद्वारे प्रक्रिया करून रियानच्या घशात अडकलेलं नाणं बाहेर काढलं. या प्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी या मुलाला घरी सोडण्यात आले,’’ असं डॉ. नीपा वेलिमुत्तम यांनी सांगितल.