राज्य सरकारकडून ‘महाआयुदान’ संकेतस्थळ सुरू

मुंबई : अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या राज्यभरातील रुग्णालयांची नोंदणी आणि नोंदणीचे नूतनीकरण आता ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. यासाठी राज्य सरकारने https://www.mahaayudaan.in ‘महाआयुदान’ नावाचे संकेतस्थळ सुरू केले असून याचे उद्घाटन शुक्रवारी आरोग्य संचालनालयाचे संचालक अनुप कुमार यादव, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते आरोग्य संचालनालयामध्ये केले गेले.

राज्यात एका अवयव प्रत्यारोपणासाठी १३७ रुग्णालये आणि एकापेक्षा अधिक अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी ३७ रुग्णालये नोंदणीकृत आहेत. नेत्रदान, बुबूळ प्रत्यारोपणासाठी एकूण २२७ रुग्णालयांची नोंद आहे.  ६४ रुग्णालये प्रत्यारोपणाशिवाय अवयव काढण्याचे केंद्र म्हणून नोंद आहेत. प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याऐवजी नोंदणी पद्धत ऑनलाइन करून अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणातील रुग्णालयांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हे संकेतस्थळ सुरू केले. नोंदणीकृत रुग्णालयांना दर पाच वर्षांनी नोंदणीचे नूतनीकरण करावे लागते. यासाठी पुन्हा सर्व कागदपत्रे द्यावी लागतात. रुग्णालयांच्या सोईसाठी नोंदणी आणि नोंदणीचे नूतनीकरण या दोन्ही प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाल्याने वेळेत  लवकर पूर्ण होतील आणि याचा फायदा रुग्णांनाच होऊ शकेल, असे आरोग्य संचानालयाचे साहाय्यक संचालक डॉ. अरुण यादव यांनी सांगितले. या ऑनलाइन पोर्टलमध्ये अवयव, ऊतींचे दान आणि प्रत्यारोपण यांची राज्यभरातील माहिती दररोज अद्ययावत होईल. यामध्ये दाता आणि अवयव प्राप्त होणाऱ्या रुग्णांची माहिती उघड केली जाणार नाही, असेही यादव यांनी स्पष्ट केले. विभागीय, आणि राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थांनाही या पोटर्लमध्ये सहभागी करून घेतल्याने यातील सांख्यिकी माहितीचा निश्चितच फायदा होईल. रुग्णालयीन स्तरावर अवयवदान समिती किंवा प्रशासनामध्ये बदल झाल्यानंतर पुन्हा नव्याने आरोग्य विभागाला कळवावे लागत असे. ही प्रक्रिया ऑनलाइनमुळे सोईस्कर होईल, असे विभागीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या प्रमुख डॉ. अ‍ॅस्ट्रिड लोबो यांनी सांगितले.