“दादरा-नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मी वारंवार परिस्थिती सांगून देखील आत्महत्येस उद्युक्त केल्याचा गुन्हा मुंबईत दाखल करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दबाव टाकला. शिवाय सर्व माहीत असून देखील या प्रकरणात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) ची स्थापना करण्याची आणि या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची घोषणा त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ मार्च २०२१ रोजी केली”, असा आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवेल्या पत्रात केला आहे. आपल्या पत्रात परमबीर सिंग यांनी तब्बल २३ मुद्द्यांचा समावेश केला असून हे पत्र त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना पाठवले आहे.

आपल्या पत्रामध्ये परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये मुंबईतल्या बार, रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश सचिन वाझेंना देणे, गृहमंत्र्यांविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना आधीच माहिती दिली असणे अशा गंभीर दाव्यांचा समावेश आहे. १०० कोटींच्या दाव्याच्या पुराव्यादाखल परमबीर सिंग यांनी एसीपी पाटील यांच्यासोबतचे मेसेजेस देखील पत्रात दिले आहेत.

“गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं”, परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप!

मुंबईत गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. या प्रकरणावरून राज्यातील सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षात असलेल्या भाजपावर अनेकदा टीका देखील केली आहे. मात्र, याच प्रकरणात मुंबईत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा दबाव गृहमंत्र्यांकडून टाकला जात असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.

“‘वर्षा’वर सर्व परिस्थिती मांडली होती”

“मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात मुंबईत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची पहिल्या दिवसापासूनच गृहमत्री अनिल देशमुख यांची इच्छा होती. याविषयी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर माझ्यामते फक्त आत्महत्या इथे झाली असली तरी कथित आत्महत्येस उद्युक्त केल्याचा प्रकार हा दादरा-नगर हवेलीमध्येच झाा असावा. त्यामुळे असं काही झालं असेल, तर तो गुन्हा दादरा-नगर हवेलीतच दाखल व्हायला हवा होता आणि तिथल्याच पोलिसांनी त्याचा तपास करायला हवा होता. ही घटना झाल्यानंतर वर्षावर झालेल्या चर्चेदरम्यान मी माझं हे मत मांडल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तपास दादरा-नगर हवेलीच्या पोलिसांमार्फतच व्हायला हवी यावर सगळ्यांचच एकमत झालं होतं”, असं परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे.

अनिल देशमुखांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवारांनाही माहिती होतं? परमबीर सिंग यांचा पत्रात दावा!

“…तरीही गृहमंत्र्यांनी ऐकलं नाही!”

दरम्यान हे सर्व झाल्यानंतर देखील गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या मतावर ठाम असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. “मी सातत्याने विरोध करत असल्यामुळे गृहमंत्री माझ्यावर नाराज होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुंबईत दाखल केल्यामुळे मिळू शकणारा राजकीय फायदा मिळणार नव्हता. पण हे सगळं माहिती असूनही गृहमंत्र्यांनी ९ मार्च २०२१ रोजी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याबरोबरच आत्महत्येस उद्युक्त करण्याचा गुन्हा नोंद करण्याची घोषणा महाराष्ट्राच्या विधानसभेत केली”, असा देखील दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे.

 

परमबीर सिंग यांचं हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं आहे.

Story img Loader