दोन वर्षांत पश्चिम रेल्वेची कारवाई; अंधेरी, चर्चगेट, दादर स्थानकांत सर्वाधिक अस्वच्छता

रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांवर इतस्तत: थुंकून, कचरा टाकून पाणी फेरणाऱ्या ५२ हजार प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने गेल्या दोन वर्षांत कारवाई केली आहे. यापैकी सर्वाधिक कारवाई अंधेरी, चर्चगेट, दादर या स्थानकांतील प्रवाशांवर करण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेची कामे कंत्राटी पद्धतीने देण्यात येतात. तसेच स्थानक परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे अधिकार तिकीट तपासनीसांना देण्यात आले आहेत. अशा प्रवाशांना कमाल ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र अशा उपाययोजना करूनही स्थानक अस्वच्छ करण्याच्या प्रवृत्तीला वचक बसलेला नाही. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत पश्चिम रेल्वेने तब्बल ५२ हजार ११४ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. रेल्वे स्थानकात पान खाऊन थुंकणे, प्लास्टिक किंवा अन्य कचरा टाकणे या प्रमुख कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रवाशांकडून अस्वच्छता पसरविण्यात अंधेरी स्थानक हे आघाडीवर असून दोन वर्षांत पाच हजार ३६० प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यानंतर चर्चगेट स्थानकात तीन हजार ९२२ आणि दादर स्थानकात दोन हजार २९८ प्रवाशांनी अस्वच्छता पसरविल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल २०१८ ते ऑगस्ट २०१८ पर्यंत केलेल्या कारवाईत तीन हजार ६७७ प्रवाशांवर स्थानकात अस्वच्छता पसरविली म्हणून कारवाई केली आहे.

जवळपास ४ लाख १६ हजार ५०० रुपये दंडही वसूल केला आहे.