मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून UDD चे प्रधान सचिव असलेले इकबाल चहल हे काम पाहतील. तर ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांना नगरविकास खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे.

मुंबईत करोनाचा कहर वाढत असताना धडाडीचे निर्णय घेणारे आयुक्त म्हणून प्रवीण परदेशी यांचं नाव घेतलं जात होतं. अशात त्यांची आता बदली करण्यात आली आहे. तर ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल हे पद मिळण्याची वाटच बघत होते. त्यांना आता मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पद देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जरड यांनाही हटवण्यात आलं आहे. त्यांच्याजागी संजीव जैस्वाल यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मदत आणि पुनवर्सन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांचीही बदली करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी इकबाल चहल यांना आयुक्त म्हणून नेमण्यात आलं आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातच प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता.

कोण आहेत प्रवीण परदेशी?

प्रवीण परदेशी हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत

त्यांनी मे २०१९ मध्येच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता

प्रवीण परदेशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी असल्याचं सांगण्यात येतं

प्रवीण परदेशी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात प्रवीण परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, नगर विकास आणि महसूल अशा विविध विभागांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

१९९३ मध्ये लातूरला जो भूकंप झाला तेव्हा प्रवीण परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. तेव्हा त्यांनी दाखवलेला कामाचा धडाका हा वाखाणण्याजोगा होता

पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही प्रवीण परदेशी यांनी काम पाहिलं आहे.

Story img Loader