लोकसत्ता लोकांकिके’ची प्राथमिक फेरी २४ नोव्हेंबरपासून

* ‘लोकसत्ता लोकांकिके’ची प्राथमिक फेरी २४ नोव्हेंबरपासून

* अर्ज स्वीकारण्यास आजपासून सुरूवात, २१ नोव्हेंबर शेवटची मुदत

तरुणांच्या प्रतिभेला एकांकिकांच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ नेमकी सुरू होणार कधी, या नाटय़वेडय़ा तरूणाईला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ अखेर आली आहे. १ नोव्हेंबरपासून (गुरूवारी) या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेकरिता अर्ज करता येणार आहे.

२१ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची मुदत असेल. नाटय़ क्षेत्रातील मान्यवरांसमोर आपली कला सिद्ध करण्याची संधी देणाऱ्या या स्पर्धेचे प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. मुंबईत २४ नोव्हेंबरला होणाऱ्या विभागीय प्राथमिक फेरीपासून या स्पर्धेच्या प्रवासाला सुरूवात होईल. चार वर्षांत या स्पर्धेने फुलपाखरू मालिकेतील चेतन वडणेरे, नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या लोकप्रिय चित्रपटातील ‘आनी’ अर्थात अनुजा मुळ्ये, ‘देवयानी’ आणि ‘लव्ह लग्न लोचा’ मालिकेतील सिद्धी कारखानीस असे अनेक तरुण चेहरे मालिका, चित्रपटविश्वाला दिले. ग्लॅमरच्या विश्वात पाऊल ठेवण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या अनोख्या एकांकिका स्पर्धेचा मंच पुन्हा एकदा तरुण नाटय़कर्मीसाठी खुला झाला आहे. नाटय़कर्मीच्या विचारांना एकांकिकेच्या नाटय़ातून वळणवाट देत लोकांपर्यंत पोहोचविण्याची अनोखी संधी सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑईल कॉपरेरेशन लिमिटेड असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’च्या निमित्ताने मिळते. स्पर्धेच्या माध्यमातून उमटणारी ही तरुण सर्जनशील प्रतिभा ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या माध्यमातून त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर येते. अनेक तरूणांनी या संधीचे सोने करत केवळ अभिनयच नव्हे तर दिग्दर्शन, लेखन किंवा नेपथ्य या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

राज्यभरातील आठ शहरांमधल्या, तिथल्या गावागावातून महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुण मनांना ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत व्यक्त होता येणार आहे. स्पर्धेच्या नेहमीच्या स्वरुपाप्रमाणे याहीवर्षी प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी आणि त्यानंतर महाअंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान मिळवण्यासाठी स्पर्धकांना चुरशीचा सामना करावा लागणार आहे.

‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’साठी सुरुवातीपासूनच टॅलेंट सर्च पार्टनर म्हणून बरोबर असलेले ‘आयरिस प्रॉडक्शन’ याही वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर चमकणाऱ्या कलावंतांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी देणार आहेत.  ‘एरेना मल्टिमिडीया’ या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहतील.

विभागीय प्राथमिक फेरीचे वेळापत्रक आणि अर्ज करण्यासाठी संपर्क

मुंबई – २४ आणि २५ नोव्हेंबर – मकरंद पाटील (९८९२५४७२७५)

ठाणे – १ आणि २ डिसेंबर – मिलिंद दाभोळकर (९१६७२२१२४६), सुभाष कदम (९७६९३६८१११)

नाशिक – ७ आणि ८ डिसेंबर – वंदन चंद्रात्रे (९४२२२४५०६५)

रत्नागिरी – ४ डिसेंबर – हेमंत चोप्रा (९४२००९५१०४)

पुणे – १ आणि २ डिसेंबर – अमोल गाडगीळ (९८८१२५६०८२)

कोल्हापूर – १० आणि ११ डिसेंबर – दीपक क्षीरसागर (९८८१२५६०४९)

औरंगाबाद – ३ आणि ४ डिसेंबर – शिवा देशपांडे (९९२२४००९७६)

नागपूर -२ आणि ३ डिसेंबर – गजानन बोबडे (९८२२७२८६०३)

अशी होईल स्पर्धा..

सळसळत्या अविष्काराचा हा प्रवास मुंबईत २४ आणि २५ नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या विभागीय प्राथमिक फेरीपासून सुरू होईल. त्यानंतर ठाणे (१ आणि २ डिसेंबर), नाशिक (७ आणि ८ डिसेंबर), रत्नागिरी (४ डिसेंबर), पुणे (१ आणि २ डिसेंबर), कोल्हापूर (१० आणि ११ डिसेंबर), औरंगाबाद (३ आणि ४ डिसेंबर) आणि नागपूर (२ आणि ३ डिसेंबर) असे वळण घेत ही स्पर्धा विभागीय अंतिम फेरीच्या टप्प्यावर थोडी विश्रांती घेईल. त्यानंतर ८ ते १० डिसेंबर दरम्यान विभागीय अंतिम फेऱ्यांच्या माध्यमातून हा प्रवास वेग घेईल. त्यात निवड झालेल्या सवरेत्कृष्ट आठ विभागीय एकांकिकांमधून ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ निवडली जाणार आहे.