एकेकाळी राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवून दिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत रिडल्स इन िंहंदुइझम या इंग्रजी ग्रंथाच्या मराठी अनुवादित ग्रंथाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात काही गडबड नको म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने दडपून ठेवलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन आता भाजप-शिवसेना युती सरकारच्या प्रारंभाच्या कालखंडात होत आहे, याला विशेष महत्व आहे.  
रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण या दोन दैवी व्यक्तीमत्वाची कठोर चिकित्सा करणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदुइझम या इंग्रजी ग्रंथाने १९८७-८८ च्या दरम्यान मोठे वादळ उठविले होते.  या ग्रंथावर बंदी घालावी अशी मागणी शिवसेना व अन्य संघटनांनी केली होती. त्यानंतर या ग्रंथाच्या समर्थनार्थ आणि विरोधात मोर्चे-प्रतिमोर्चे, आंदोलने-प्रतिआंदोलने झाली होती. या ग्रंथाने सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून काढले होते. सामाजिक तणावही निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र  सर्व रिपब्लिकन नेते, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांनी एकत्रित बसून या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी सरकार सहमत नाही, अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला. त्यानंतर मोठय़ा प्रमाणावर या ग्रंथाची विक्री झाली व अजूनही होत आहे.
उच्च शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती आहे. या समितीच्या वतीने बाबासाहेबांचे अप्रकाशीत साहित्य प्रकाशीत केले जाते. आता पर्यंत २२ खंड प्रकाशित झाले आहेत. त्यांतील बहुतेक ग्रंथ इंग्रजी भाषेत आहेत. सर्व सामान्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार जावेत, यासाठी या सर्व इंग्रजी ग्रंथांचा मराठीत अनुवाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी दिली. त्यानुसार सध्या अॅनिहिलेशन ऑफ कास्ट या स्वतंत्र ग्रंथाबरोबरच लेखन व भाषणे खंड १ आणि खंड ४ यांचे भाषांतर तयार आहे. रिडल्स इन हिंदुइझम हा चौथा खंड आहे.  अन्य दोन ग्रंथाबरोबर रिडल्सच्या मराठी अनुवादीत ग्रंथाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. सुरुवातीला १५ हजार प्रती छापण्याचे ठरविले आहे. त्यानंतर जशी मागणी येईल तशी छपाई करण्यात येऊन अधिकच्या प्रती काढल्या जातील. हा ग्रंथ मराठी माणसाच्या घराघरात पोहचावा, यासाठी त्याची किंमतही अगदी नामामात्र ठेवण्याचे समितीने ठरविले आहे, असे डोळस यांनी सांगितले.
रिडल्स इन हिंदुइझमचा मराठी अनुवाद तयार असताना निवडणुकीत काही गडबड नको म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने त्याच्या प्रकाशनाची जोखीम घेतली नाही. परंतु एकेकाळी या ग्रंथाला विरोध करणाऱ्या शिवसेना-भाजप सरकारच्या काळातच त्याचे प्रकाशन होत आहे, त्याला विशेष महत्व आहे.  

Story img Loader