मुंबईमधील मेट्रो प्रकल्पाच्या कामावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि प्रमुखविरोधी पक्ष असणारा भाजपा पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं चित्र पहायाला मिळत आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन दिल्ली मेट्रोमधील प्रवासाचे काही फोटो ट्विट केले. यामध्ये त्यांनी मुंबई मेट्रो कधी पूर्ण होईल असा प्रश्नही उपस्थित केला. या प्रश्नाला काँग्रेसने उत्तर दिलं आहे.

झालं असं की देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये होते. त्यांनी दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोने प्रवास केला. या प्रवासातील काही फोटो त्यांनी आपल्या सोशल मिडिया हॅण्डलवरुन शेअर केले. “मी आज दिल्ली विमानतळावर येण्यासाठी मेट्रोने प्रवास केला. रस्ते मार्गाने प्रवास करताना लागणाऱ्या वेळेपेक्षा खूपच कमी वेळ मला या प्रवासात लागला. मात्र महाविकास आघाडी सरकारने कारशेड्या विषयावरुन घातलेला गोंधळ आणि निर्माण केलेल्या गुंतागुंतीमुळे मी मुंबईतील मेट्रो थ्रीमधून विमानतळापर्यंत कधी प्रवास करु शकेन ठाऊक नाही,” असा टोला फडणवीस यांनी हे फोटो शेअर करताना लगावला.

फडणवीस यांच्या या ट्विटची दखल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी घेतली आहे. फडणवीस यांचं ट्विट रिट्विट करुन त्यावर प्रतिक्रिया देताना सावंत यांनी मुंबई सध्या जी एकमेव मेट्रो सेवा सुरु आहे ती सुद्धी आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरु झाली असल्याची आठवण करुन दिली आहे. तसेच सावंत यांनी फडणवीस सरकारला २०१९ च्या नियोजित वेळमर्यादेत म्हणजेच डेटलाइनच्या आत मेट्रोचं काम पूर्ण करता आलं नाही असंही सावंत म्हणाले आहेत. “काँग्रेस सरकारच्या काळात निर्माण झालेल्या दिल्ली मेट्रोचं तुम्ही कौतुक केलं याचं समाधान आहे. मुंबईमध्येही जी एकमेव मेट्रो सेवा पूर्ण झाली आहे ती सुद्धा आघाडी सरकारच्या काळात झालीय. तुमच्या सरकारला २०१९ ची डेडलाइन पाळता आळी नाही. महाविकास आघाडीला प्रशासकीय कामांचा प्रदीर्घ अनुभव असून तुमच्या सरकारला जमलं नाही ते काम आम्ही नक्कीच करु फक्त मोदी सरकाने निर्माण केलेले अडथळे दूर झाले पाहिजेत,” असं सावंत यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

पुढच्या ट्विटमध्ये सावंत यांनी मेट्रो काडशेडच्या गोंधळासंदर्भात भाष्य केलं आहे. “कांजूर येथील जमीन उफलब्ध होती. मात्र तुमच्या सरकारने तिथे गोंधळ घालून जागेचा सौदा शापुरजी पालोनजी बिल्डर सोबत केला. तुमच्या सरकारने खासगी बिल्डरला सार्वजनिक मेट्रोपेक्षा अधिक झुकतं माप दिलं. तुम्हाला या मेट्रोच्या गोंधळासाठी कोणाला दोष द्यायचा असेल तर तुम्ही आरशात पहावे,” असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

सावंत यांनी दिलेल्या उत्तरावरुन आता पुन्हा एका मेट्रो या विषयावरुन भाजपा आणि महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद होण्याची चिन्हं दिसत आहेत.