मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दंड न भरणाऱ्यांच्या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे आहेत. आपल्याला या दंडाबाबत काहीही माहित नसून वाहनचालकाने वाहतूक नियम मोडले असे स्पष्टीकरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहे. ‘मुंबई मिरर’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे अशा गुन्ह्यांसाठी राज्यभरात दंड आकारला जातो. मुंबईत हा दंड ट्रॅफिक पोलीस वसूल करत नाहीतर तर नियम मोडणाऱ्यांना वाहतूक विभागाकडून ई चलान पाठवण्यात येते. त्या ई चलाननुसार जो दंड असेल तर तो वाहन मालकांना भरावा लागतो. मात्र मुंबईतल्या अनेक दिग्गजांनी दंड भरलेला नाही अशी बातमी समोर येते आहे. आत्तापर्यंत एकूण ११९ कोटींचा दंड वसूल होणे बाकी आहे. हा दंड न भरणाऱ्यांची एक यादीच तयार करण्यात आली आहे. या यादीत राज ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता सलमान खान, भाजपाचे नेते राम कदम यांची नावे आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने ई चलान द्वारे पाठवण्यात आलेला दंड भरला आहे. तर राम कदम यांच्या ज्या कारला दंड आकारण्यात आला आहे ती कार आपण काही काळापूर्वी विकल्याचे त्यांनी म्हटले आहे. ई चलान भरण्यासाठी सक्ती नसल्याने लोक दंड भरत नाहीत असे वाहतूक विभागाने म्हटल्याचेही ‘मुंबई मिरर’ने आपल्या वृत्तात स्पष्ट केले आहे.

दंड न भरलेल्या यादीत कोणाची नावे आहेत?
विनोदवीर कपिल शर्मा
महापौर विश्वनाथ महाडेश्वर
भाजप नेते राम कदम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे
परिवहन मंत्री दिवाकर रावते
अभिनेता सलमान खान

अभिनेता सलमान खानशी या संदर्भात संपर्क साधला असता आपल्याला कोणत्याही प्रकारचे ई चलान आलेले नाही असे त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. ज्या कारने नियमभंग केला त्या कारचा क्रमांक एम. एच. ०२ बी. वाय. २७२७ असा असून ती कार सलमानचा भाऊ अरबाझ खान याच्या अरबाझ खान प्रॉडक्शन प्रा. लि. कंपनीच्या मालकीची आहे अशीही माहिती समोर आली आहे.

युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या एम. एच. ०२ सीबी १२३४ या वाहनाने नियम मोडले आहेत. डिसेंबर २०१६ ते मे २०१८ या कालावधीत या कारने सहावेळा नियमभंग केला आहे. मात्र हर्षल प्रधान यांनी असे म्हटले आहे की आदित्य ठाकरे यांना कायद्याचा आदर आहे. त्यांना या प्रकारे कोणतेही ई चलान आलेले नाही. नियमभंग त्यांच्या कारचालकाकडून झाला असेही प्रधान यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan raj thackeray aditya thackeray and manya famous personalities not paid fine for breaking traffic rules
Show comments