थंडी, पाऊस, ऊन, गारपीट अशा हवामानातील स्थित्यंतराचा अनुभव घेतलेल्या मुंबईकरांच्या भेटीला रविवारपासून धूळ आली आहे. ही धूळ थेट सौदी अरेबियाच्या वाळवंटामधून अरबी समुद्र ओलांडून गुजरात व महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात पोहोचली असून सोमवारीही त्याचा प्रभाव कायम राहील. मात्र या ‘धुळवडी’चा स्थानिक हवामानावर परिणाम होणार नसल्याचे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले.
नैर्ऋत्येकडून आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे बुधवारी (१ एप्रिल) सौदी अरेबिया, बाहरिन, कतार, दुबई आणि कुवैतला धुळीच्या प्रचंड वादळाचा तडाखा बसला. त्यानंतर गुरुवारी या वादळाने पूर्वेला प्रवास सुरू करीत ओमेन गाठले. पन्नास मीटर अंतरावरही दिसत नसल्याने आंतरराष्ट्रीय विमान सेवाही कोलमडली. या वादळामुळे वातावरणात उडालेली प्रचंड धूळ वाऱ्यांसोबत शेकडो सागरी मैल पार करून भारताच्या किनाऱ्यावर आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र व इतर काही भागात रविवारी सकाळपासूनच आभाळ धुळीत हरवलेले दिसत होते. हवेत मोठय़ा प्रमाणात धूलिकण पसरल्यामुळे दाट धुक्यासारखी परिस्थती झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना डोळ्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे या धुळीच्या वादळाचा फटका हवाई वाहतुकीबरोबरच पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. पुणे जिल्ह्य़ात लोणावळा, मावळ, पिंपरी-चिंचवड परिसरात सकाळपासून आकाशात धुळीचे लोट दिसत होते.mu04उपग्रहाच्या छायाचित्रांमुळे ही धूळ सौदी अरेबियातून आल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक अजय कुमार यांनी दिली. वातावरणातील धूळ मोजण्याचे परिमाण नाही. एरवीही अल्प प्रमाणात सौदीकडून अशी धूळ येत असावी. मात्र त्याची नोंद ठेवली जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई
तीन वर्षांपूर्वी..
*२१ मार्च २०१२ रोजी अशा रीतीने प्रचंड धूळ मुंबईत आली होती. राजस्थानमधील धुळीची वादळे गुजरात तसेच दिल्लीपर्यंत पोहोचतात.
*कधी कधी त्याचा प्रभाव मुंबईतही दिसत असल्याने ही धूळ याच प्रकारातील असेल, असे हवामानतज्ज्ञांना वाटले होते.
*उपग्रहातून काढलेल्या छायाचित्रांमुळे त्यावेळी ही धूळ अरबी समुद्राच्या पलिकडून आल्याचे स्पष्ट झाले.  
*ओमानवरून आलेल्या या वादळाचा मुख्य मार्ग गुजरात, राजस्थानपासून उत्तरेकडे होता. मात्र या मुख्य मार्गाहून काहीशा बाजूला असलेल्या मुंबईवरही दोन दिवस या धुळीचा प्रभाव होता.