भारतात क्रिकेटचे वेड लहानांपासून वृद्धांपर्यत आपल्याला पाहायला मिळत असतं. आयपीएल सारख्या स्पर्धा सुरू झाल्यापासून भारतात क्रिकेटचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. क्रिकेटमध्ये करियर करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. क्रिकेटच्या संघात स्थान मिळवणे एका मुलाला चांगलेच महागात पडले आहे.

आयपीएलच्या कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघात स्थान मिळवून देतो असे सागंत एका १८ वर्षीय मुलाची फसवणूक करण्यात आली आहे. संघात स्थान देण्यासाठी तीन जणांनी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप मुलाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

फसवणूक झालेल्या कुटुंबीयांनी आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. फसवणूक झालेला मुलगा मुलुंडच्या एका क्रिकेट क्लबमध्ये सराव करतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नुकताच हा मुलगा फोर्ट येथील कर्नाटक स्पोर्ट्स क्लबमध्ये सरावासाठी जाऊ लागलेला. आठवड्यातून दोनदा तेथे सरावासाठी जात असे. तिथे त्याची भेट पुष्कर तिवारी नावाच्या व्यक्तीशी झाली. आपण हिमाचल प्रदेशच्या संघात गोलंदाज होतो असे त्याने सांगितले. त्याने फसवणूक झालेल्या मुलाला महाराष्ट्राच्या क्रिकेट संघासाठी प्रयत्न न करण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्राच्या संघात प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. त्यामुळे स्पर्धा टाळण्यासाठी इतर राज्यातून खेळण्याचा सल्ला त्याने दिला. त्यानंतर तिवारीने आपण स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीच्या मालकीच्या एका व्यक्तीला ओळखतो आणि केकेआरच्या संघाला एका बॉलरची ताबडतोब गरज असल्याचे त्याने सांगितले. तिवारीच्या सल्ल्यानुसार मुलाच्या वडिलांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीच्या मालकाशी संवाद साधला. त्यावेळी संघात जागा मिळवण्यासाठी ३० लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानंतर मुलाच्या कुटुंबियानी स्पोर्ट्स कंपनीच्या मालकाला दोन आठवड्यात ३० लाख रुपये दिले,असे पोलिसांनी सांगितले.

पैसे मिळाल्यानंतर स्पोर्ट्स कंपनीच्या मालकाने एप्रिलमध्ये आयपीएल सुरु होईल तेव्हाच त्या मुलाच्या निवडीसाठी केकेआरच्या संघासोबत १० लाखाचा करार करण्यात येईल असे सांगितले. मात्र आयपीएल सुरू होऊनही संघात निवड न झाल्याने मुलाच्या वडिलांनी स्पोर्ट्स कंपनीच्या मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्पोर्ट्स कंपनीच्या मालकाने मुलाच्या वडिलांचे कॉल घेण्यास टाळाटाळ सुरू केली. कुटुंबाला ही गोष्ट संशयास्पद वाटल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर मुलाच्या कुटूंबाने स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीच्या मालक आणि तिवारीविरूद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.

Story img Loader