शहराचे प्रशासन अडचणीत, सर्व भार आयुक्तांवर

महानगरपालिकेतील चारही अतिरिक्त आयुक्तांसह बेस्टच्या महाव्यवस्थापकांनाही गुजरात निवडणुकांच्या कामासाठी पाठवण्यात येणार आहे. या सर्व अधिकाऱ्यांकडे शहरातील विविध विभागांची जबाबदारी असून त्या संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकारही आहेत. त्यांना निवडणुकीसाठी जावे लागल्यास एवढय़ा मोठय़ा महानगरीचे कामकाज कसे सांभाळायचे, असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे.

वर्षांला २५ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या या शहराचे प्रशासन पाहण्यासाठी आयुक्त अजोय मेहता यांच्यासह चार अतिरिक्त आयुक्त आहेत. या चारही अतिरिक्त आयुक्तांना ७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र या कामासाठी पालिकेतील सर्व अतिरिक्त आयुक्तांना निवडल्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. पालिकेमध्ये १०० हून अधिक विभाग असून या सर्व विभागांची जबाबदारी या चार अधिकाऱ्यांकडे असते. या विभागांमधील सर्व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकारही या अधिकाऱ्यांकडे आहेत. शहरात सध्या वाहनतळ धोरण, कचरा व्यवस्थापन, फेरीवाले, अतिक्रमण अशा विविध समस्या असून जीएसटीमुळे अनेक कंत्राटेही रखडली आहेत. गुजरात निवडणुकींसाठी सर्व अधिकारी गेल्यास शहरातील विकासाच्या सर्व कामांना महिनाभर खीळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांपैकी किमान दोन अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला पाठवू नये, असे आयुक्त अजोय मेहता यांनी कळवल्याचे समजते. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

अमित शहा प्रचारात सक्रिय

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी राज्यातील भाजप नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. शहा शनिवारपासून गुजरातमध्ये प्रचारात सक्रिय झाले आहेत.

वलसाड, नवसरी तसेच डांग जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांशी त्यांनी नवसरी येथे चर्चा केली. दुपारी आदिवासी बहुल पट्टय़ातील पंचमहल व दाहोद जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांना ग्रोध्रा शहरातील बैठकीत मार्गदर्शन केले. तर रविवारी सायंकाळी उत्तर गुजरातमधील हिमायतनगर येथे साबरकांठा व अरवेली जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. शनिवारी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. ९ नोव्हेंबरपर्यंत अमित शहा इतर जिल्ह्य़ातील नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.

‘गुजरातची जनता भाजपला हटवेल’

उस्मानाबाद : थापा देऊन देशातील आणि राज्यातील जनतेला भाजपा सरकारने फसवले आहे. त्यांच्या फसव्या घोषणांना जनता भुलणार नाही. हे फडणवीस नव्हे तर फसवणीस सरकार असल्याचे राज्यातील नागरिकांनी ओळखले आहे. त्यामुळेच नांदेडमधून बदलास सुरुवात झाली आहे. पुढील काळात गुजरातमध्ये देखील सत्ताधारी भाजपाला मतदार खुर्चीतून खेचून दूर करेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.