मुंबई : लक्षद्वीप येथील नवीन प्रशासक प्रफुल पटेल यांच्या निर्णयांमुळे स्थानिक पातळीवर बेरोजगारीसह विविध समस्या तयार होत असून असंतोष निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्षद्वीप प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

स्थानिक लोकांशी समन्वय साधून काम करणाऱ्या प्रशासकाची तेथे नियुक्ती केली जावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे. लक्षद्वीपचे खासदार पी. पी. मोहम्मद फै जल यांनी लक्षद्वीपच्या नवीन प्रशासकांबाबत उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याचे पवार यांनी स्पष्ट के ले आहे. स्थानिक मच्छिमारांची किनारपट्टीवरील साहित्यसामुग्री कसलीही नोटीस न बजावता उद्ध्वस्त करणे, अंगणवाड्या बंद करून लोकांना बेरोजगार करणे, तेथे दारूबंदी असताना नव्याने त्याबाबतची परवानगी देणे, स्थानिक डेअऱ्या बंद करून त्यांच्या खासगीकरणाची प्रक्रि या सुरू करणे अशा विविध ११ मुद्यांवर पवार यांचे पत्र आधारित आहे.

राहुल गांधी यांचेही ट्वीट

‘सत्तेतील अज्ञानी कट्टर व्यक्ती’ लक्षद्वीप बेटे नष्ट करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल पटेल हे केवळ या बेटांची शांतता व संस्कृतीच नष्ट करीत नसून, लोकांवर मनमानी निर्बंध लादून त्यांचा ‘छळ’ करत आहेत, असा आरोप करत काँग्रेसने त्यांना तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी राहुल यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘लक्षद्वीप हे महासागरातील भारताचे रत्न आहे. मात्र सत्तेतील अज्ञानी व्यक्ती त्याला नष्ट करीत आहेत. मी लक्षद्वीपच्या लोकांसोबत उभा आहे,’ असे राहुल यांनी बुधवारी ट्विटरवर लिहिले.