अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून वर्गणी गोळा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. त्यामुळे भाजपा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून शिवसेना व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, “राम मंदिराच्या विषयात शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना अडथळे आणण्यासाठी पहिल्या दिवसापासून कोण प्रवृत्त करत आहे?” असा प्रश्न देखील शेलार यांनी उपस्थित केला आहे.

“ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना…”; भातखळकरांची शिवसेनेवर टीका

शेलार यांनी ट्विटद्वारे शिवसेना व संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “राम जन्मभूमी आंदोलन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदनीय अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, महंत रामचंद्र परमहंस यांच्यासह कोठारी बंधु ते कारसेवक किती नावे संघर्षाची, त्यागाची, समर्पित आयुष्याची घ्यावीत..” असं शेलार म्हणाले आहेत.

तसेच, “या आंदोलनात ज्यांची केवळ होती राजकीय घुसखोरी त्यांनाच झाली होती राम मंदिराच्या भूमी पुजनाची पोटदुखी आणि त्यांनाच आता डोळ्यात खूपतेय “रामवर्गणी”, राम भक्त हो! मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?” असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता; निलेश राणेंचा हल्लाबोल

“राम मंदिराच्या विषयात शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना अडथळे आणण्यासाठी पहिल्या दिवसापासून कोण प्रवृत्त करत आहे? ज्यावेळी पायाभरणीचा कार्यक्रम होता त्यावेळी देखील हा कार्यक्रम ऑनलाईन केला जावा म्हणून अडथळा आणला गेला. आता सामान्य नागरिकांच्या स्वेच्छा निधीतून राम मंदिराचं काम होतंय, त्याला देखील अडथळा आणला जात आहे. अगोदर म्हणायचं पहिले मंदिर नंतर सरकार, मग सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडथळा आणायचा. या पद्धतीची राम विरोधी भूमिका शिवसेना घेत आहे, असं आमचं म्हणणं आहे.” असं देखील आशिष शेलार यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.

तर, चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेकडून आज सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आला आहे.

रामाच्या नावावरचं राजकीय नाट्य बंद करा  – संजय राऊत

तसेच, “’चंदा धंदा है की गंदा है’ मला माहिती नाही. परंतू अयोध्येचा राजा प्रभू श्रीरामाचे मंदिर आता बनत आहे. त्यांच्या मंदिरासाठी लोकांनी बलिदान दिलं आहे, रक्त सांडलं आहे आणि न्यायालयाच्या आदेशाने मंदिर बनत आहे. पंतप्रधानांनी त्याचे भूमिपूजन केले आहे. आता अयोध्येच्या राजासाठी पैसे मागण्यासाठी तुम्ही घरोघरी जाल तर हा राजाचा अपमान आहे व हिंदुत्वाचा देखील अपमान आहे. मला वाटतं रामल्लाच्या नावावर अयोध्येत जे बँक खाते उघडण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वांनीच जे मोठमोठाले दानशूर आहेत देशात ते सर्वजण त्यात पैसे टाकत आहेत. शिवसेनेने देखील १ कोटी रुपये दिले आहेत. असे असंख्य लोकं आहेत. तर मग जे चार लोकं तुम्ही गावागावात पाठवत आहात, कुणाच्या प्रचारासाठी पाठवत आहात? आता हे रामाच्या नावावरचं राजकीय नाट्य बंद करा. राम मंदिर बनत आहे, तर तुम्ही राजकारण थांबवा.” असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटलं आहे.