केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं. मात्र, नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तिथे शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं दुधानं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यात नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिथे फुलं वाहण्यात आली आहेत. दरम्यान, नारायण राणे या ठिकाणी सकाळी आले होते, त्यासाठी हे शुद्धीकरण केल्याचं सांगितलं जात आहे. आप्पा पाटील यांच्यासोबत काही शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते त्यावेळी हजर होते.

“त्यांना आजपर्यंत बाळासाहेब दिसले नाहीत”

दरम्यान, आप्पा पाटील यांनी यावेळी नारायण राणे यांच्यावर देखील टीका केली आहे. “आज ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केलं. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं तिथे वाहिली आहे. त्यांना आज शिवसेना दिसली. इतक्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते. देशाच्या टॉप ५ मध्ये असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते काहीही बोलत होते. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही हे शुद्धीकरण केलं आहे. मी रोज इथे येतो”, अशी प्रतिक्रिया हे शुद्धीकरण करणारे शिवसेना कार्यकर्ते आप्पा पाटील यांनी दिली आहे.

“आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच…”, राणेंनी दिला आठवणींना उजाळा!

“सकाळी मी आलो होतो. पण पोलिसांनी मला आतमध्ये येऊ दिलं नाही. पण माझं रक्त मला शांत बसू देत नव्हतं. कुठेतरी ही वास्तू पवित्र होणं गरजेचं आहे असं मला वाटलं. मग बाळासाहेबांच्या वास्तूला दुग्धाभिषेक करून ती पवित्र करण्याचा माझा प्रयत्न केला”, असं देखील आप्पा पाटील म्हणाले आहेत.

राणेंच्या स्मृतीस्थळावर येण्याला होता विरोध

केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतून त्याला विरोध करण्यात आला होता. खासदार विनायक राऊत यांनी राणेंना स्मृतीस्थळाच्या ठिकाणी पाऊल ठेऊ देणार नाही, अशी घोषणा देखील केली होती. मात्र, त्यानंतर वातावरण निवळलं आणि राणेंनी विनासायास स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं.

शिवसेनेत आता फक्त झाडांवर उड्या मारणारे राहिलेत – नारायण राणे

नारायण राणेंची शिवसेनेवर खोचक टीका

दरम्यान, यानंतर या मुद्द्यावरून राणेंनी उलट शिवसेनेवरच खोचक टीका केली आहे. “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर मी मानवंदना देण्यासाठी जाऊ नये यासाठी प्रयत्न झाले. कुणी मला अडवायला तरी आलं पाहिजे. पण कुणीच आलं नाही. माणसं राहिलेच नाहीयेत शिवसेनेत. झाडावर उड्या मारतात, तेवढेच उरलेत”, असा टोला राणेंनी लगावला आहे.

 

नारायण राणे यांनी आपल्या भाषणामध्ये शिवसेनेला लक्ष्य करतानाच आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं.