सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा जाहीर इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्याने काही लोकांच्या पोटात दुखत असून अस्वस्थ आहेत. वैफल्यातून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप केले जात आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“आदित्य ठाकरे यांचा या सगळ्याशी काय संबंध. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्याने विरोधी पक्षातील काही जणांच्या पोटात दुखत आहे, अस्वस्थ आहेत. ज्यांना हे सरकार अजूनपर्यंत रुचलेलं नाही ते वैफल्यातून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करत आहेत. मला तर हे संपूर्ण महाराष्ट्राविरोधात कारस्थान असल्याची शंका आहे. यामागील सूत्रधार आम्हाला माहिती आहेत. त्या सगळ्यांना या कारस्थानाची मोठी किंमत मोजावी लागेल असं मी जाहीरपणे सांगतो,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले….
सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. करोना संकटाचा हाहाकार असताना महाराष्ट्र सरकारही करोनाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशात महाराष्ट्र सरकारचे यश अनेकांना खुपते आहे. त्यामुळे सुशांत सिंह प्रकरणात माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबीयांवर नाहक चिखलफेक केली जाते आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

“सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूड हे मुंबईचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू जितका दुर्दैवी आहे तितकाच धक्कादायकही… मुंबई पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत. महाराष्ट्रातल्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक या प्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत” असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

“मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी संयमाने वागतोच आहे. अशा प्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कुणीही राहू नये.” असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.