मुंबईत करोनाचा विळखा वाढतच चालला असल्याचे रोजच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यातच कारागृहातील कैद्यांबाबतही आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, आर्थर रोड येथील मुंबई मध्यवर्ती कारागृहातील आणखी ८१ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकूण करोनाबाधित कैद्यांची संख्या १५८ वर पोहोचली आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच इतर नागरी, वैद्यकीय आणि वाहतूक समस्या यांमुळे राज्य शासनाने उभारलेल्या माहुल येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये कैद्यांना ठेवणे शक्य नसल्याने आर्थर रोड येथील कारागृहातील सर्कल नंबर ३ आणि १० येथे त्यांच्यासाठी  क्वारंटाइन वॉर्ड उभारण्यात आला आहे. या ठिकाणी चाचणी केल्यानंतर आज (रविवार) नव्याने ८१ कैद्यांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पण्ण झाले.

दरम्यान, जे. जे. रुग्णालयातील सात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एका पथकाने रुग्णालयातील या वॉर्डला भेट दिली. यापुढे हे पथक या वॉर्डला दररोज भेट देणार असून इथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे.