अयोध्येतील नियोजित श्रीरामजन्मभूमी मंदिर हे पूर्णपणे जनतेच्या आर्थिक सहभागातूनच उभे राहणार असून संक्रांतीपासून त्याचे निधी संकलन सुरू होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव, तसेच विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपतराय यांनी दिली. श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व निधी संकलन याबाबत अधिक माहिती देण्याकरिता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी चंपतराय म्हणाले की, अयोध्येची लढाई प्रभू श्रीरामांची जन्मभूमी पुन्हा प्राप्त करण्यासाठी होती. समाज त्या जागेस प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान मानतो. तिथे पूर्वी मंदिर होते. परकीय आक्रमकांनी मंदिर तोडले हा राष्ट्राचा अपमान होता. हा अपमान संपवण्यासाठी आम्ही हे स्थान परत मिळवले. हे आंदोलन देशाच्या सन्मानाच्या रक्षणार्थ होते. यासाठी समाजाने ५०० वर्षे संघर्ष केला. अखेर समाजाच्या भावना सर्वांनी समजून घेतल्या. श्रीरामजन्मभूमी मंदिराशी निगडित तथ्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आणि भारत सरकारला राम जन्मभूमीसाठी ट्रस्टची घोषणा करण्याचे निर्देश दिले. सरकारने या सूचनांचे पालन करत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र नावाने ट्रस्टची घोषणा केली. मंदिराचे प्रारूप थोडे वाढविण्यात आले असून त्यानुसार सर्व तयाऱ्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांनी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत पूजन करत मंदिराच्या निर्मिती प्रक्रियेस वेग प्रदान केला. सध्या मंदिराच्या निर्मितीची तयारी सुरू आहे. मृदा परीक्षण करण्यात आले. गर्भगृहाच्या पश्चिमेस शरयूचा जलप्रवाह आणि जमिनीखाली भूरभूरित वाळू अशी येथील भौगोलिक स्थिती आहे.
लार्सन अँड टुब्रो कंपनी या मंदिराचे बांधकाम करत आहे –
अशोक सिंहल यांनी मुंबईस येऊन लार्सन अँड टुब्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार लार्सन अँड टुब्रो कंपनी या मंदिराचे बांधकाम करत आहे. या कंपनीस सल्ला देण्यासाठी टाटा कन्सल्टंट इंजीनिअर्सची निवड करण्यात आली आहे. सर्व प्रकारची प्रबंध झाले असून मंदिराच्या वास्तूची जबाबदारी अहमदाबादच्या चंद्रकांत सोमपुरा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते १९८६पासूनच या प्रकल्पाशी संलग्न आहेत. सोमपुरा यांच्या आजोबांनी सोमनाथ मंदिर बांधले होते. स्वामी नारायण परंपरेची अनेक मंदिरे त्यांनी बांधली आहेत. दगडांपासून मंदिरे बांधणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. सध्या अयोध्येच्या वालुकामय जमिनीवर मजबूत पायाच्या दगडी मंदिरांचे बांधकाम कसे करावे यावर विचार सुरू आहे. पुढील तीन वर्षांत हे मंदिर उभे राहील अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली.
मंदिराच्या प्रारूपाबद्दल ते म्हणाले की, संपूर्ण मंदिर दगडी बांधण्यात येणार असून प्रत्येक मजल्याची उंची २० फूट, मंदिराची लांबी ३६० फूट आणि रुंदी २३५ फूट आहे. जमिनीपासून १६.५ फूट उंचीवर मंदिराचा फरसबंदी पृष्ठभाग असेल. आयआयटी मुंबई, आयआयटी चेन्नई, आयआयटी गुवाहाटी. सीबीआरआय रुरकी, लार्सन अँड टूब्रो आणि टाटाचे इंजीनिअर पायाच्या रेखाटनावर परस्परांत चर्चा करीत आहेत. लवकरच पायाचे प्रारूपाची माहिती सर्वांना मिळेल.
देशाच्या कानाकोपऱ्यात राम जन्मभूमीबाबत वाचनीय साहित्य पुरवले जाणार –
भारताच्या वर्तमान पिढीस मंदिराच्या ऐतिहासिक तथ्यांची माहिती देण्याचीही योजना तयार करण्यात आली आहे. देशातील अर्ध्या लोकसंख्येस श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या ऐतिहासिक सत्याची जाणीव करून देण्याचा विचार करण्यात आला आहे. घराघरात संपर्क केला जाईल, देशाचा कोनाकोपरा यातून सुटणार नाही, अरुणाचल प्रदेश, नागालँड-अंदमान निकोबार, कच्छपासून पर्वतीय क्षेत्रांपर्यंत सर्वत्र जाऊन समाजास राम जन्मभूमीबाबत वाचनीय साहित्य पुरवले जाईल. प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवर मंदिर उभे राहावे ही संपूर्ण देशाची मनःपूर्वक इच्छा आहे.
जनसंपर्काचे कार्य मकरसंक्रांतीस सुरू होणार –
जन्मभूमी परत मिळवण्यास लाखो भक्तांनी हाल सोसले, मदत केली. त्याच पद्धतीने कोट्यवधींच्या स्वैच्छिक सहयोगाने हे मंदिर उभे राहावे अशी आमची इच्छा आहे. जेव्हा जनसंपर्क केला जाईल तेव्हा लाखो कार्यकर्ते गाव, वस्त्यांमध्ये जातील तेव्हा समाज स्वाभाविकच काही ना काही मदत नक्कीच करेल. देवाचे कार्य आहे, मंदिर देवाचे घर आहे, देवाच्या कार्यामध्ये पैसा ही अडचण ठरू शकत नाही. समाजाचे समर्पण कार्यकर्ते स्वीकारतील. आर्थिक विषयात पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे. पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी आम्ही दहा रुपये, शंभर रुपये, एक हजार रुपये अशी कूपन आणि पावत्या छापल्या आहेत. समाज जशी मदत करेल त्याला अनुसरून कार्यकर्ते पारदर्शकतेसाठी कूपन किंवा पावत्या त्यांना देतील. कोट्यवधी घरांमध्ये मंदिराचे चित्र पोहोचेल. जनसंपर्काचे हे कार्य मकरसंक्रांतीस सुरू होईल व माघ पौर्णिमेस पूर्ण होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्चमध्ये ट्रस्टचे बँक खाते तयार करण्यात आले. या खात्यात या पूर्वीच लोकांनी आपला आर्थिक सहयोग देण्यास सुरुवात केली आहे. दररोज १००० ते १२०० बँक ट्रान्झॅक्शन होत आहेत. याच पद्धतीने कुपनांच्या माध्यमातूनही नागरिक आपला खारीचा वाटा नक्की उचलतील, असा विश्वासही चंपतराय यांनी व्यक्त केला.