नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे. या वर्षात मध्य रेल्वेवर एक दोन नाही तर सहा एसी लोकल धावणार आहेत. विशेष बाब म्हणजे या पश्चिम रेल्वेवर धावलेल्या लोकल नसून नव्या लोकल्स मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. याआधी पश्चिम रेल्वे मार्गावर धावलेल्या लोकल्स मध्य रेल्वे मार्गावर वळवल्या जात असत. मात्र एसी लोकलच्या बाबतीत असे होणार नाही. प्रवाशांनी याबाबत व्यक्त केलेल्या नाराजीचा विचार करून सहा नव्या कोऱ्या लोकल मध्य रेल्वेवर धावणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार यात शंका नाही.

२०१९ या वर्षात एकूण १२ एसी लोकल रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. ज्यापैकी सहा लोकल्स मध्य रेल्वे तर सहा लोकल्स पश्चिम रेल्वेवर धावणार आहेत. नव्या एसी लोकलसोबतच मध्य रेल्वेवरून आता राजधानी एक्स्प्रेसही सुटणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजधानी एक्स्प्रेस पश्चिम रेल्वे मार्गावरून दिल्लीला जात होती. मात्र आता मध्य रेल्वे मार्गावरूनही राजधानी एक्स्प्रेस धावणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भातली घोषणा केली. राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग सीएसएमटी ते दिल्ली असा असेल. सीएसएमटीहून ही गाडी थेट कल्याणला थांबेल, त्यानंतर नाशिक, जळगाव, खांडवा, भोपाळ, झांसी, आग्रा आणि हजरत निजामुद्दीन मार्गे जाईल. या निर्णयामुळे पहिल्यांदाच राजधानी एक्स्रपेस गुजरातऐवजी मध्यप्रदेशातून धावणार आहे.