राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे असेही उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

तौक्ते चक्रीवादळ अतितीव्र

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने रविवारी अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. रविवारी या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रासह गोवा<em>, केरळ आदी भागाला जोरदार तडाखा दिला. सोमवारी (१७ मे) मुंबई परिसर, ठाणे, पालघर आणि रायगड या भागांवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण भागांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

१७० किलोमीटर वेगाने वारे

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांमध्ये शनिवारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला केरळ, कर्नाटक राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा फटका बसला. रविवारी सकाळी चक्रीवादळ अतितीव्र होऊन त्याचा वेगही वाढला. समुद्रामध्ये सध्या ताशी सुमारे १७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. रविवारी संध्याकाळपर्यंत वेगाने चक्रीवादळ पुढे सरकत होते. गोव्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असताना या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पुढे ते दक्षिण कोकण किनारपट्टीजवळ सरकले. त्यामुळे या भागात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला होता. याच कालावधीत कोल्हापूर आणि सांगली परिसरातही चक्रीवादळाचा परिणाम जाणवला. या भागातही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली. बहुतांश भागांत विजेचे खांब कोसळले, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. पश्चिम घाट परिसरात सर्वदूर वादळी वारा आणि जोरदार पाऊस झाला.

आज मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळ मुंबईला धडकणार नसले तरी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्य़ांतही अतिमुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मुंबई, ठाणे जिल्ह्य़ासाठी सोमवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर येथेही सोमवार आणि मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्य़ांमध्ये सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर सोसाटय़ाचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत साधारण ७० ते ९० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मच्छिमारांनीही समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभाग आणि महापालिकेने केले आहे.

मुंबईतील वातावरण बदललं

या वादळाने शनिवार रात्रीपासूनच मुंबईतील वातावरण बदलून गेले. शनिवारी रात्री आणि रविवारीही मुंबईतील अनेक भागांत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने २८.८ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्राने २८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली होती. मात्र, रविवारी पावसाच्या सरींमुळे किमान आणि कमाल तापमानातही काहिशी घट झाली. रविवारी सांताक्रुझ केंद्राने २६.४ अंश सेल्सिअस किमान तर ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. कुलाबा केंद्राने २७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची तर ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली.