तौते चक्रीवादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा सुटला असून पाऊसदेखील सुरु आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडला चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेला असून मोठं नुकसान झालेलं आहे. मुंबईलादेखील मोठा फटका बसलेला असून पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

दरम्यान चक्रीवादळामुळे मुंबई विमानतळ चार वाजेपर्यंत बंद करण्यात आलं असल्याने विमान सेवेवरही परिणाम झाला आहे. विमानतळ बंद असल्याने मुंबईत लँडिंग करणाऱ्या तीन विमानांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

मुंबईसाठी उड्डाण केलेलं इंडिगोचं विमान हैदराबादच्या दिशेने वळवण्यात आलं असून, दुसरं विमान पुन्हा लखनऊला पाठवण्यात आलं आहे. तर स्पाइसजेटचं विमान सूरतला वळवण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.

विमानतळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सेवा बंद करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र नंतर ही वेळ दुपारी ४ वाजेपर्यंत वाढवत असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान मुंबईत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईत १०२ किमी वेगाने वारे वाहत होते, आज संध्याकाळपर्यंत अशीच परिस्थिती राहील अशी माहिती मुंबई वेधशाळेच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दिली आहे.