टिळक रुग्णालयात करोनाची ‘सीबीनॅट चाचणी’

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : एका तासात करोनाचे निदान करणाऱ्या ‘काटिर्र्जबेस न्युक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्प्लीफिके शन (सीबीनॅट) यंत्रा’द्वारे चाचणी करण्याची सुविधा मंगळवारपासून शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सुरू झाली आहे. त्यामुळे आता या रुग्णालयात दिवसभरात ६० चाचण्या करणे शक्य होणार आहे.

धारावीमध्ये रुग्णांची वाढती संख्या आणि वेळेत निदान होण्याची गरज लक्षात घेऊन ‘जीनएक्सपर्ट’ तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही चाचणी करण्यासाठी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि अन्न व औषध प्रशासनाने मंजुरी दिली असून मुंबईत प्रथमच ही सुविधा सुरू झाली आहे.

क्षयरोगाच्या चाचणीसाठी हे यंत्र वापरले जाते. आरटीपीसीआर प्रणालीप्रमाणे कार्यरत असलेल्या या यंत्राचा वापरही करोना चाचणीसाठी करण्याची शिफारस आयसीएमआरने केल्यानंतर टिळक रुग्णालयाने यासाठी परवानगी मागितली होती.

धारावीतील अनेक रुग्ण टिळक रुग्णालयात दररोज दाखल होत आहेत. रुग्णालयात प्रयोगशाळा नसल्याने यांचे नमुने केईएममध्ये पाठवले जातात. आपत्कालीन स्थितीमध्ये शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्यास किंवा तातडीने अन्य उपचार देण्यासाठी रुग्णाचे निदान होणे अत्यावश्यक असते. अशा वेळी कमी वेळेत निदान करणारे सीबीनॅट यंत्र नक्कीच फायदेशीर असल्याचे टिळक रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुजाता बावेजा यांनी सांगितले.

या यंत्राच्या मदतीने दिवसभरात ६० चाचण्या करणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे चाचण्यांची क्षमताही वाढेल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमाल यांनी सांगितले. याच्या चाचणीसाठी काटिर्र्ज वापरले जाते. याची किंमतही साधारणपणे १९०० रुपयांपर्यंत असते. त्यामुळे तुलनेने ही चाचणी स्वस्तही आहे. काटिर्र्जचे उत्पादन कमी होत असल्याने सध्या मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जिथे मोठय़ा क्षमतेच्या आरटीपीसीआर यंत्र उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी सीबीनॅट करण्याची परवानगी दिली जात नाही.

क्षयरोगाच्या चाचण्यांसाठी अनेक ठिकाणी सीबीनॅट यंत्र उपलब्ध आहेत. यासाठी केंद्राकडून दहा हजार काटिर्र्ज राज्य सरकारला प्राप्त झाले आहे. तेव्हा आरटीपीसीआर उपलब्ध नसलेल्या परंतु सीबीनॅट यंत्र उपलब्ध असलेल्या जिल्हा रुग्णालयांनी आयसीएमआरकडे चाचणी करण्याची परवानगी मिळविण्यासाठी अर्ज दाखल करण्याचेही आदेश दिलेले आहेत.

‘सीबीनॅट चाचणी’चे महत्त्व

आरटीपीसीआर यंत्रामध्ये एकावेळी ३०, ९० किंवा यंत्राच्या क्षमतेप्रमाणे नमुन्यांची तपासणी करता येते. तसेच याचा अहवाल येण्यासाठी किमान तीन तासांचा कालावधी लागतो. याउलट सीबीनॅटमध्ये एका नमुन्याचीही चाचणी करता येते. एक ते दीड तासांमध्ये अहवाल उपलब्ध होतो.

Story img Loader