परदेशस्थ मुलाच्या कोरडय़ा ई-मेलने आप्त आणि पोलीसही सुन्न
मातापित्यांना मागे सोडून पोटापाण्यासाठी परदेशी जाणारी मुले-मुली किंवा एकमेकांशी न पटल्यामुळे विभक्त झालेली कुटुंबे अशा अनेक कारणांमुळे एकाकीपण आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न महानगरीत गंभीर होत चालला आहे. दूर देशी राहावयास गेलेल्या एका मुलाने एकमेकांमधील कटुतेपोटी पित्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करणेही नाकारल्याची घटना नुकतीच मुंबईत घडली. त्या आधी एकाकीपण असह्य़ झालेल्या अंधेरीतील एका वृद्ध महिलेच्या मृत्यूचा थांगपत्ताही अनेक महिने शेजाऱ्यांना लागला नव्हता.
फोर्ट येथील मोगल इमारतीत राहणारे फ्रान्सिस कुटिन्हो (६०) यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. सुमारे चार ते पाच दिवस त्यांचा मृतदेह घरात पडून असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून फ्रान्सिस एकटेच राहत आहेत. त्यामुळे त्यांचा मृतदेह सोपविण्यासाठी पोलिसांनी फ्रान्सिस यांच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू केली. फ्रान्सिस यांची भाची सांचा डिकास्टा मुंबईत राहत असल्याचे कळताच पोलिसांनी तिच्याशी संपर्क केला. फ्रान्सिस यांचा मुलगा केल्विन याला फोन लागत नसल्याने डिकास्टा यांनी ई-मेलद्वारे वडिलांच्या मृत्यूचे वृत्त कळविले. त्या मेलवर आलेले प्रत्युत्तर मात्र सर्वाना सुन्न करणारे होते. ‘मला वेळ नसल्याने तुम्ही परस्पर अंत्यसंस्कार करा आणि मला त्यांच्या संपत्तीत रस नाही,’ अशा आशयाचा त्याचा मेल पाहून पोलिसांबरोबरच सर्वानाच धक्का बसला. ‘मुलगा येणार नसल्याने अखेर डिकास्टा यांच्याकडेच फ्रान्सिस यांचा मृतदेह सोपवावा लागला,’ असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी सांगितले. या सुन्न करणाऱ्या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या एकाकी जगण्याचा प्रश्न अधोरेखित झाला आहे.
या आधी ऑगस्ट महिन्यात अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरातही आशा सहानी (६३) या महिलेचा सांगाडा पोलिसांना मिळाला होता. २०१३ साली पतीच्या मृत्यूनंतर त्या नैराश्यात होत्या. २०१६ सालच्या ऑगस्ट महिन्यात आशा यांचे मुलासोबत फोनवर शेवटचे बोलणे झाले होते. जवळपास वर्षभर आईकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने मुलगा २०१७च्या ऑगस्ट महिन्यात घरी आला. तेव्हा घर आतून बंद होते. दरवाजा तोडून आत आल्यानंतर त्याला पलंगावर आईचा सांगाडा आढळून आला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनांमुळे शहरातील वृद्धांच्या एकाकीपणाचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे लक्षात येते.
वेळ काढून संवाद साधा
हेल्पएज इंडियाच्या मदत क्रमांकावर अनेक ज्येष्ठ नागरिक संपर्क साधतात. प्रत्येक वेळेस त्यांची काही समस्या असतेच असे नाही. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ते अनेकदा फोन करतात. त्यामुळे कुटुंबीयांनी आपल्या घरातील ज्येष्ठांसोबत काही वेळ काढून संवाद साधला तर त्यांना मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होईल, असे बोरगावरकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांसाठीचे धोरण बासनात
भारतात ज्येष्ठांची संख्या साधारण साडेअकरा कोटींच्या जवळपास आहे. यात ज्येष्ठ महिलांची संख्या ५३ टक्क्यांपर्यंत आहे. यामधील ९० टक्के ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्टय़ा कुटुंबीयांवर अवलंबून आहेत आणि ४० टक्के ज्येष्ठ हे एकाकी आयुष्य जगत आहेत. सध्या मुंबई आणि देशपातळीवर ज्येष्ठांचा एकटेपणा कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. अनेक सामाजिक संस्था ‘डे केअर सेंटर’ चालवीत आहेत. सरकारने १ ऑक्टोबर, २०१३ रोजी ज्येष्ठ नागरिकांसासाठी विशेष धोरण जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात त्याचा अवलंब करण्यात आला नाही, अशी खंत ‘हेल्पएज इंडिया’ या संस्थेचे प्रमुख प्रकाश बोरगावकर यांनी व्यक्त केली.
एकाकीपणाबरोबरच आर्थिकदृष्टय़ा मुलामुलींवर किंवा इतरांवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठांचे प्रश्न अधिक जटिल बनत जातात. अशा ज्येष्ठांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यासाठी सरकारी पातळीवर पेन्शन योजना सुरू झाली. मात्र अजुनही अनेक गरजू या योजनेपासून दूर आहेत. – प्रकाश बोरगावकर, ‘हेल्पएज इंडिया’ या संस्थेचे प्रमुख