लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्या १७ हजार पुरुष प्रवाशांना पश्चिम रेल्वेवर गेल्या वर्षभरात पकडण्यात आले आहे. किमान ही घुसखोरी महिलादिनी तरी थांबावी, यासाठी तीन दिवस विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ५ मार्च ते ८ मार्चपर्यंत विशेष मोहीम चालेल, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बारा डबा लोकलमध्ये महिलांसाठी द्वितीय श्रेणी आणि प्रथम श्रेणीचा डबा राखीव असतो. या डब्यात पुरुष प्रवाशाने घुसखोरी केल्यास त्याला दंड होतो. मात्र अशा घुसखोरांवर कारवाई करूनही परिस्थिती पुन्हा जैसे थेच असते. प्रवासात महिलांची छेडछाड, मारहाण इत्यादी घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी डब्यात रात्री आठनंतर सुरक्षारक्षक नेमला जातो. तर काही डब्यात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. परंतु यानंतरही घुसखोरांना आळा बसलेला नाही.

महिला डब्यात पुरुष प्रवाशांनी घुसखोरी केल्याने २०१९ मध्ये १४ हजार ३०७ जणांना पकडण्यात आले, तर २०२० मधील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मिळून २ हजार ९८१ प्रकरणे दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. यात एकूण ३७ लाख रुपये दंड वसूल केला आहे. ही घुसखोरी पाहता किमान महिलादिनी तरी घुसखोरी होऊ नये यासाठी ५ मार्च ते ८ मार्चपर्यंत पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त घुसखोरांना पकडण्याचा प्रयत्न असेल, तर त्यांना रेल्वे न्यायालयाकडून अधिकचा दंड होण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.