तिकीट व प्रवेश मिळविण्यासाठी घाई; अपुऱ्या तिकीट खिडक्या, बंद एटीव्हीएममुळे गोंधळ

मुंबई, ठाणे : मध्य आणि पश्चिम मार्गांवरील लोकलसेवा दहा महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारपासून पुन्हा सुरू झाली, मात्र सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पहिल्या दिवशी गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी सातच्या आधी, दुपारी बाराच्या नंतर आणि सायंकाळी चारच्या आधी या वेळांतच सर्वसामान्यांना प्रवासाला परवानगी असल्याने अनेक नोकरदारांनी सकाळी सातच्या आधी स्थानक गाठले. स्थानकातील बंद एटीव्हीएम, कमी तिकीट खिडक्यांमुळे लागलेल्या रांगा, स्थानकात प्रवेश मिळवण्याची घाई, दोन-तीन महिने प्रवास करूनही पोलिसांकडून स्थानकात प्रवेशास दिला जाणारा नकार यांमुळे प्रवाशांना मनस्ताप झाला.

सर्वसामान्य नागरिकांना सोमवारपासून पहाटेच्या पहिल्या लोकलपासून ते सकाळी ७ पर्यंत आणि दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ नंतर लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजता कार्यालयाची वेळ असणाऱ्यांनी सकाळी सातच्या आधीच स्थानकात प्रवेश केला. पहिला दिवस असल्याकारणाने तिकीट काढणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे सर्वच स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तिकीट खिडक्या पूर्ण क्षमतेने सुरू नव्हत्या तर स्वयंचलित तिकीट यंत्रणा (एटीव्हीएम) अनेक ठिकाणी बंद होत्या. त्यामुळे तिकीट खिडक्यांवर प्रवाशांची अक्षरश: रेटारेटी सुरू होती.

दुपारी १२ वाजताही ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील तिकीट खिडक्यांवर आणि एटीव्हीएम मशीनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यामध्ये फिरतीवर (फिल्डवर्क) काम करणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते.  डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकात उशिरा आलेले प्रवासी शिक्षा होईल या भीतीने माघारी फिरताना दिसत होते.

पोलिसांकडून अडवणूक

प्रवाशांचा लोंढा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच स्थानकांत लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दर, तिकीट तपासनीस यांचा फौजफाटा तैनात होता. स्थानकातील प्रवेशद्वारांबरोबरच तिकीट खिडक्यांजवळही त्यांची गस्त होती. रांगेत उभे राहून तिकीट काढण्यासाठी झालेला विलंब आणि कार्यालयात जाण्याची निकड लक्षात घेऊन सकाळी ७ नंतर पाच ते दहा मिनिटे उशिरा पोहोचणाऱ्यांना पोलीस स्थानकात प्रवेश देत होते. परंतु त्यानंतर मात्र रेल्वे पोलिसांनी आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात के ली. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासण्यात येत होते. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात होता. तर सामान्य नागरिकांना स्थानकात प्रवेश नाकारण्यात येत होता. यावरून रेल्वे पोलीस व प्रवाशांमध्ये स्थानकातील प्रवेशद्वारांवर वादही झाले.

मी एका विमान कं पनीत ग्राऊंड इंजिनीयर म्हणून काम करतो. माझे कं पनीचे ओळखपत्र व लोकल प्रवासासाठी कं पनीने दिलेल्या पत्रावर पास मिळवून नोव्हेंबरपासून लोकल प्रवास करत आहे. मात्र कं पनीने दिलेल्या पत्रावर माझे नाव नसल्याचे सांगून स्थानकात सकाळी ८ वाजता लोकल प्रवेश करण्यास रेल्वे पोलिसांनी परवानगी नाकारली. – प्रथमेश जोगळेकर, ठाणे

 

माझे वडील आजारी असतात. उपचारासाठी त्यांना के ईएम रुग्णालयात घेऊन जावे लागते. लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने विविध तपासणींसाठी मुलुंड ते केईएम असा बसने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे तासन्तास प्रवास व खर्चही बराच होत होता. सामान्यांसाठी लोकल खुली झाल्याने आता वडिलांचा आरोग्य अहवाल दाखवण्यासाठी लोकलने प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. – गणेश जावीर, मुलुंड

 

मी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करतो. सरकारी कर्मचारी असूनही मला टाळेबंदीच्या काळात तिकीट नाकारण्यात येत होते. त्यामुळे १० महिने चार बसगाड्या बदलून दररोज ठाणे ते नवी मुंबई प्रवास करत होतो. आतादेखील १० वाजताकामाची वेळ असताना ६ वाजता घर सोडावे लागले.  – महेंद्र मांजरेकर, ठाणे

ठाण्यामध्ये कामाला असून कार्यालयीन वेळ सकाळी ८ वाजताची आहे. दिव्याहून सकाळी ६.३० वाजताच ठाणे रेल्वे स्थानकात पोहचलो. आता स्थानकाबाहेर दीड ते दोन तास फेरफटका मारण्याशिवाय पर्याय नाही. – शांताराम बंगेरा, दिवा