नोंदणीत मोठी वाढ; निर्बंधांमुळे ‘कॅम्पिंग’बाबत मात्र संभ्रम
मुंबई : करोनाच्या सावटाखाली सरणाऱ्या वर्षांला निरोप देण्याबरोबरच नववर्षांच्या स्वागतासाठी नजीकच्या रिसॉर्टकडे पर्यटकांचा ओढा आहे. महिनाअखेरच्या दहा दिवसांमध्ये सर्वच रिसॉर्टच्या मागणीत वाढ झाल्याचे रिसॉर्ट मालकांनी सांगितले. मात्र, गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेल्या ‘कॅम्पिंग’बाबत स्थानिक प्रशासनाच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मागणी नोंदवताना आयोजक संभ्रमावस्थेत दिसत आहेत.
दिवाळीच्या दरम्यान अनेक रिसॉर्टना उत्तम प्रतिसाद मिळाला. पाठोपाठ नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी अनेकांनी शहराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. नाताळला जोडून आलेल्या शनिवार-रविवारमुळे लोणावळा, अलिबाग, भंडारदरा आणि इगतपुरी परिसरातील रिसॉर्ट, कृषी पर्यटन के ंद्रांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
रिसॉर्ट नोंदणी दिवाळीपासूनच वाढली आहे. प्रामुख्याने २० ते २५ जणांचे समूह नोंदणी करीत आहेत. सध्या दहाही दिवसांसाठी नोंदणी झाली असून त्यामध्येदेखील छोटे समूह असल्याचे, अलिबागजवळील नागाव येथील हृषीवन व्हिलाच्या स्वराली मडवी यांनी सांगितले. कृषी पर्यटन केंद्रांचा प्रतिसाददेखील वाढत असल्याचे लोणावळ्याजवळील शिळीम येथील अंजनवेल कृषी पर्यटन केंद्राचे राहुल जगताप यांनी सांगितले. मोठय़ा रिसॉर्टच्या मागणीतदेखील वाढ झाली असून, जवळपास ९० टक्के नोंदणी झाल्याचे खंडाळा येथील ‘डय़ूक्स रिट्रीट’चे व्यवस्थापक राजेश गुलेरिया यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे संगीत-नृत्याच्या मोठय़ा कार्यक्र मांना फाटा दिला असून, कर्णमधुर वाद्यसंगीताचा समावेश के ल्याचे त्यांनी नमूद के ले.
गेल्या काही वर्षांत गतवर्षांला निरोप आणि नववर्षांचे स्वागत मोकळ्या वातावरणात तंबू ठोकून करण्याची संधी देणारे ‘कॅम्पिंग’चे प्रमाण वाढले आहे. पवना, भंडारदरा, मुळशी हे जलाशय, किनारे, पनवेलजवळील प्रबळगडाची माची, रायगडमधील समुद्रकिनारे अशा ठिकाणी ‘कॅम्पिंग’चे संपूर्ण नियोजन करणारी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र यावर्षी ‘कॅम्पिंग’बाबत प्रशासनाची नेमकी भूमिका काय हे माहीत नसल्याने आयोजक संभ्रमात आहेत. ‘आयत्यावेळी अशा ठिकाणी संचारबंदी जाहीर केली तर गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे यावर्षी अद्यापही ‘कॅम्पिंग’साठी नोंदणी घेतली नसल्याचे,’ पवना लेक कॅम्पिंगचे रवी ठाकर यांनी सांगितले. एरवी १५ डिसेंबपर्यंत ‘कॅम्पिंग’ची नोंदणी पूर्ण होते, यंदा तसे चित्र नसल्याचे ते म्हणाले.
साम्रद, प्रबळगड माची अशा ठिकाणी वन विभागाची परवानगीदेखील आवश्यक असते. प्रबळगड माचीवरील ‘कॅम्पिंग’साठी अद्याप वन विभागाने परवानगी दिली नसल्याने ३१ डिसेंबरसाठी नोंदणी करणे टाळत असल्याचे, प्रबळगड माचीवरील कॅम्पिंग आयोजकांनी सांगितले.
छोटय़ा खासगी वाहनांना अधिक पसंती
पर्यटनस्थळी जाण्यासाठी बसगाडय़ांऐवजी छोटय़ा वाहनांना अधिक पसंती मिळत आहे. २५ डिसेंबरला नाताळची सुट्टी आहे, तर २६ डिसेंबरला चौथा शनिवार असून कार्यालयेही बंद आहेत. त्यामुळे गुरुवारपासूनच पर्यटनस्थळांवर गर्दी दिसू लागेल. लोणावळा, महाबळेश्वर, नाशिक, दमण, अलिबागला जाण्यासाठी छोटय़ा वाहनांची नोंदणी सर्वाधिक होत आहे. मुंबई बस मालक संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी, यंदा जवळच्याच पर्यटनस्थळांना भेटी देण्यावर बहुतांश लोकांनी भर दिल्याचे सांगितले. प्रवासादरम्यान गर्दी टाळण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलर, इनोव्हा अशा सात आसनी, तसेच १३, १७, २० आणि २५ आसनी खासगी गाडय़ांचे ५० ते ६० टक्के बुकिंग झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटकांनी ५०० किमीपर्यंतच्या पर्यटनस्थळांची निवड केल्याचे ते म्हणाले.
रेल्वेला प्रतीक्षायादी, एसटी आरक्षित
’गोव्यापर्यंत जाण्यासाठी सीएसएमटी ते मडगाव विशेष गाडी, एलटीटी ते मडगाव यासह अन्य काही गाडय़ांसाठी २४ व २५ डिसेंबरला प्रतीक्षा यादी आहे.
’मुंबई सेन्ट्रल, परळ आगारातून पणजीसाठी सुटणाऱ्या गाडय़ा, तर मुंबईतून विजयदुर्ग, मालवण, देवगडला जाणाऱ्या एसटीचे देखील येत्या शुक्रवार, शनिवारी आरक्षण झाल्याचे एसटी महामंडळातील जनसंपर्क विभागाने सांगितले.