सरकते जिने, लिफ्ट नसल्याने रेल्वे प्रवास त्रासदायक; मुखपट्टी घालून जिने चढणे कठीण
मुंबई : करोना संक्रमणाचे कारण पुढे करत मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील सरकते जिने, लिफ्ट बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र याचा सर्वाधिक फटका अपंग, वयोवृद्ध आणि गर्भवती महिलांना होत आहे. जिने चढणे आधीच शारीरिकदृष्टय़ा जमत नसताना मुखपट्टी घालून जिने पार करणे त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू लागले आहे.
विविध श्रेणींच्या प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी दिल्याने पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची संख्या ६ लाख ९३ हजारांवर, तर मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्या ७ लाखांवर गेली आहे. सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्याने प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये ज्येष्ठ नागरिक, गर्भवतीही असतात. याशिवाय अपंग व्यक्तीही लोकल प्रवास करीत आहेत. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार स्थानकापर्यंत ५२ सरकते जिने आहेत. तर मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकात ७६ सरकते जिने असून ते टाळेबंदीनंतर बंद झाले ते आजतागायत तसेच आहेत. त्यामुळे पादचारी पूल चढताना या सर्व प्रवाशांची दमछाक उडते.
गर्भवती असलेल्या स्नेहल पेडणेकर या सानपाडय़ाला राहतात. एका औषध कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या स्नेहल यांना दररोज कामानिमित्त मुंबईतही यावे लागते. लोकलने प्रवास करून स्थानकात उतरल्यानंतर बंद असलेल्या सरकत्या जिन्यांमुळे पादचारी पूल चढण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे खूपच दम लागतो. मध्य रेल्वेवरील दादरच्या तीन व चार नंबर फलाटावरील सरकता जिना जून महिन्यात सुरू होता. परंतु त्यानंतर तो बंदच असल्याचे त्या म्हणाल्या.
घाटकोपर ते सीएसएमटी असा अपंगांच्या डब्यातून प्रवास करणारे नितीन गायकवाड यांनीही बंद सरकत्या जिन्यांमुळे नाराजी व्यक्त केली. खासगी कामानिमित्त आठवडय़ातून दोन दिवस तरी बाहेर जाणे होतेच. त्या वेळी स्थानकातील पादचारी पूल चढताना अपंग प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो. अपंग प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर गर्दी पाहून त्या स्थानकातील सरकते जिने सुरू करणे गरजेचे होते, असे गायकवाड म्हणाले.
आढावा घेऊन जिने सुरू करणार
‘गर्दी होऊन करोनामुळे संक्रमण होऊ नये यासाठी सरकते जिने व लिफ्ट बंद ठेवण्यात आले आहेत,’ असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनी सांगितले. सरकते जिने सुरू करण्यासंदर्भात आढावा घेत आहोत. मात्र सर्वच सरकते जिने सुरू करणे योग्य राहील की नाही याचा विचार केला जात असल्याचे ते म्हणाले. तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनीही सरकते जिने हे टप्प्याटप्प्यात सुरू केले जातील, अशी माहिती दिली.