मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली होती. राणे यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जामीन मंजूर केला. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. “सेना भवनाबद्दल बोलणाऱ्याचं थोबाड फोडा”, असं मुख्यमंत्री बोलले, असं बोलणं हा गुन्हा नाही का?, असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

“जन आशिर्वाद यात्रेचा प्रतिसाद पहावला गेला नाही म्हणून हे सर्व घडवून आणलं. ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून मला सहन झालं नाही. म्हणून जे बोललो ते रेकॉर्डवर आहे.” असे राणे म्हणाले.

राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे आहे

राणे यांनी बोलतांना शिवसेनेवर टीका केली. “राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे आहे, दिशा सॅलियनचं कोणी केलं? कोण मंत्री उपस्थित होता त्याचा छडा का लागत नाही. दुसरं पुजा चव्हाण प्रकरण, यामध्ये सहभागी असलेल्या मंत्र्याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पाठलाग करणार,” असा इशारा राणे यांनी दिला.

Video : नारायण राणेंच्या अटकेचा अर्थ काय?; गिरीश कुबेर यांचे विश्लेषण

चांगुलपणाचा फायदा उचलला

राणे म्हणाले, “दोन्ही निकाल माझ्या बाजून लागले आहेत. देशात अजूनही कायद्याचं राज्य आहे हे दिसून येतं. काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आलं आहे”