मुंबई : शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेल्या १५ आरोपींवरील आरोप निश्चितीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी दहशतवादासारख्या गंभीर आरोपासह १७ आरोपांचा मसुदा विशेष न्यायालयात सादर केला. या मसुद्यावर विशेष न्यायालय २३ ऑगस्टला सुनावणी होणार असून त्यानंतर आरोप निश्चिती प्रक्रि या होईल.

या प्रकरणी मानवाधिकार हक्कांसाठी लढणाऱ्या सुधा भारद्वाज, वेर्णन गोन्साल्विस, वरवरा राव, हानी बाबू, प्रा. आनंद तेलतुंबडे, शोमा सेन, गौतम नवलखा यांच्यासह १५ जण अटकेत आहेत. त्यांच्याविरोधात एनआयएने आरोपांचा मसुदा सादर केला आहे. त्यात बेकायदा कारवाया प्रतिवंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) दहशतवादाच्या गंभीर आरोपासह विविध कलमांअतर्गत आरोपांचा समावेश आहे.

आरोपनिश्चितीनंतर खटल्याला सुरुवात होते. आरोप निश्चितीपूर्वी आरोपींनी केलेल्या विविध अर्जांवर सुनावणी घेऊन ते निकाली काढण्याची मागणी आरोपींच्या वकिलांतर्फे करण्यात आली. त्यावर आरोपींनी केलेल्या सगळ्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने एनआयएला दिले. तसेच पुढील सुनावणीच्या वेळी या अर्जांवर युक्तिवाद ऐकण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.