कर्मचारी नियुक्ती, यांत्रिक प्रणाली व्यवस्थापनासाठी संस्था नेमणुकीची तयारी

मोनो रेल्वे प्रकल्पामधील बहुप्रतिक्षीत वडाळा ते संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) हा दुसरा टप्पा २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या पाश्र्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसह सुविधांच्या यांत्रिक प्रणालीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या संस्थांना नेमण्याची तयारी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए) करत आहे.

१९ किमीच्या मार्गिकेकरिता स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणेची उभारणी करणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठीची निविदा प्राधिकरणाने जाहीर केली असून मोनोचे चालक आणि व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.

मोनो प्रकल्पाला आर्थिक दृष्टय़ा उभारी देणारा १२ किमीचा वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पा २७ फेब्रुवारीपासून कार्यान्वित होणार आहे.  यांत्रिक भाग ताब्यात मिळाल्यानंतर प्राधिकरणाने नादुरुस्त असलेल्या तीन गाडय़ांची दुरुस्ती पूर्ण केली आहे. त्यामुळे चेंबूर-वडाळा या पहिल्या टप्यावर धावणाऱ्या तीन गांडय़ासह एकूण सहा गाडय़ा १९ किमीच्या संपूर्ण मार्गावर धावण्यासाठी  सज्ज आहेत. २० मिनीटांच्या अंतरांनी मोनोची सेवा प्रवाशांना मिळेल. तर चार डब्यांच्या गाडीत एकूण ५६७ प्रवासी प्रवास करु  शकतील. मेलेशियन कंपनी ‘स्कोमी’ला प्रकल्पामधून हद्दपार केल्यानंतर एमएमआरडीएच्या खांद्यावर मोनोच्या व्यवस्थापनाची धुरा आहे. त्यामुळे दुसरा टप्या कार्यान्वित करण्यासाठी मनुष्यबळासह तांत्रिक व्यवस्थापनाची जुळवाजुळव प्रशासन करीत आहे. भाडे आकारणीची पद्धत स्वयंचलित असल्याने त्याच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया प्राधिकरणाने नुकतीच खुली केली आहे.

संपूर्ण मार्गिका खुली होणार असल्याने स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणेची उभारणी करणाऱ्या कंपनीची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीच्या एका अधिकाऱ्याने दिली. २७ फेब्रुवारीपासून मार्गिका सुरू होणार असल्याने कमी अवधीत म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक कंत्राटदारांना याकरिता अर्ज करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पाहिले जाईल. मोनोच्या १७ स्थानकांच्या स्वयंचलित भाडे आकारणी यंत्रणेचे आरेखन, उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणीचे काम ही कंपनी करेल. तर मोनोच्या चालकांसह स्टेशन मास्टर आणि व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्राधिकरणाने केली आहे.