लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः घरगुती सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्ध विक्रोळी येथे बुधवारी आंदोलन करण्यात आले, त्याबाबत स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा एकूण ३०० जणांविरोधात विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विनापरवाना आंदोलन करणे, रस्ता अडवणे, पोलिसांचे आदेश डावलणे अशा विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढल्याने सरकारविरोधात विक्रोळी येथे पूर्वद्रुतगती मार्गावर शिवसेनेने (ठाकरे) निदर्शने केली. गॅस दरवाढीविरोधात शिवसेना विक्रोळी विधानसभेच्या वतीने आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्चाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना (ठाकरे) विक्रोळी मध्यवर्ती शाखेपासून पूर्व द्रुतगती मार्गापर्यंत सिलिंडरची अंत्ययात्रा काढून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विक्रोळी येथे पूर्व द्रुतगती मार्गाच्या उत्तर वाहिनीवर निदर्शने करण्यात आली. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २२३, १२६ (२) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणाविरोधात गुन्हा ?

याप्रकरणी आमदार सुनील राऊत यांच्यासह विक्रोळी विधानसभा प्रमुख परम यादव, महिला विधानसभाप्रमुख सिद्धी जाधव, अनंत पाताडे, निलेश साळुंखे, माजी नगरसेविका रश्मी पहुडकर, आसावरी भोईटे, सिद्धी जाधव, सुशिला मंचेकर, प्रिया गावडे व २०० ते ३०० कार्यकर्त्यांविरोधात याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलीस सीसी टीव्हीच्या मदतीने इतर कार्यकर्त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

कोणते आरोप ?

विक्रोळी पूर्व येथील शिवसेनेच्या कार्यालयापासून विनापरवाना आंदोलन करून रॅली काढली. यावेळी तेथील इमारत क्रमांक ५२ व ५३ च्या मधील चिंचोळ्या वाटेतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पूर्व द्रुतगती मार्गावर पोहोचले. यावेळी २०० ते ३०० कार्यकर्त्यांनी रस्तावर थांबून निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून हटण्याच्या सूचना केल्या. त्या सूचना कार्यकर्त्यांनी मानल्या नाही व निदर्शने सुरूच ठेवली. कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पूर्व दूतगती मार्गावरील उत्तर वाहिनीवर बुधवारी निदर्शने करण्यात आली. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा सर्व आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार श्रीकांत मांढरे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.