मुंबई: मुंबई विद्यापीठात किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रातील संधीचे नवे दालन खुले करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या जैवभौतिकशास्त्र विभागात असलेल्या गॅमा इरॅडिएशन चेंबर (जीआयसी) ५०००, सीओ-६० चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले असून रेडिएशन संशोधन क्षेत्रात मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. भाभा अणुशक्ती केंद्रातील तंत्रज्ञान हस्तांतरण विभागातील माजी प्रमुख पद्मश्री डॉ शरद काळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, प्रा. मयांक वाहीया आणि प्रा. वर्षा केळकर-माने ह्यांच्या उपस्थितीत या सुविधेचे उदघाटन करण्यात आले. ही सुविधा किरणोत्सर्ग संशोधनाच्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठासाठी एक महत्त्वाचा टप्पा समजला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या रेडिएशन चेंबरमुळे देशभरातील शैक्षणिक संस्था तसेच संशोधकांसाठी एक मोठे दालन खुले झाले आहे. या मशीनच्या साह्याने आरोग्यसेवा, अन्न प्रक्रिया, साहित्य विज्ञान आणि अभियांत्रिकी, रेडिएशन केमिस्ट्री, बायोलॉजिकल आणि बायोमेडिकल रिसर्च, फूड अँड ॲग्रीकल्चर, स्पेस रिसर्च इ. यासारख्या क्षेत्रांना चालना मिळणार असल्याचे जैवभौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुख, प्रा. वर्षा केळकर-माने यांनी सांगितले. ‘जीआयसी’ उदघाटन समारंभाच्या निमित्ताने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस मोठ्या संख्यने विद्यार्थी, संशोधक, व शिक्षक उपस्थित होते. किरणोत्सर्ग आणि किरणोत्सर्ग जीवशास्त्र क्षेत्रातील नामवंत शास्त्रज्ञांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर काही प्रात्यक्षिके सुद्धा दाखवण्यात आली. या एक दिवसीय कार्यशाळेत कार्यक्रमातील प्रथम वक्ते रेडिएशन कॅन्सर बॉयोलॉजी सेक्शन, बीएआरसीचे विभाग प्रमुख, डॉ.बी.एन. पांडे यांनी रेडिओबायोलॉजी आणि रेडिएशन संरक्षणाचे आरोग्यसेवेत विशेषत: कर्करोगावरील उपचार आणि सुरक्षा पद्धतींमध्ये कसा उपयोग होत आहेत यावर भर दिला.

आणखी वाचा-पश्चिम रेल्वेच्या खार रोड येथे ‘एलिव्हेटेड डेक’ची उभारणी

त्यांनी किरणोत्सर्गाच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या काही मूलभूत गोष्टी, त्याची संरक्षण यंत्रणा, उपचारात्मक क्षमता, इष्टतम मात्र आणि रेडिएशन मुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नैसर्गिक किरणोत्सर्गाचा वैमानिक तसेच फ्रिक्वेंट फ्लायर व अंतराळवीरांवर होणाऱ्या परिणामांविषयी देखील उल्लेख केला. यालाच पूरक असे मार्गदर्शन प्रा.बी.एस. राव यांनी केले. गेली ४० वर्ष रेडिएशन बायोफिजिक्समध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. राव यांनी ऑप्टिमायझेशन (ALARA तत्त्व) आणि रेडिएशनच्या मात्रेच्या मर्यादेवर लक्ष केंद्रित करून वैद्यकीय प्रयोगांमध्ये रेडिएशन संरक्षणाच्या तत्त्वांवर भर दिला. त्यांनी नियामक फ्रेमवर्क, रेडिओथेरपी, न्यूक्लियर मेडिसिन आणि रेडिओ डायग्नोस्टिक्स मधील सुरक्षित पद्धती, तसेच गर्भवती महिलांसाठी, कचरा व्यवस्थापनामध्ये आणि आणीबाणी प्रोटोकॉल वर सुद्धा भाष्य केले.

उपस्थितांच्या आग्रहास्तव जैवभौतिकशास्त्र विभाग लवकरच कार्यशाळेचे व चर्चासत्राची मालिका आयोजित करणार असून, किरणोत्सर्गाचा वापर मानवी कल्याणासाठी कसा करता येईल व त्याबद्दलचे गैरसमज दूर होऊन संशोधनास चालना मिळेल ह्याचा अधिक प्रयत्न करणार असल्याचे विभाग प्रमुख प्रा. वर्षा केळकर-माने यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunities in the field of radiation research at mumbai university mumbai print news mrj