मुंबई : मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पांचे ७६ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला असला तरी त्याचा काही भाग नोव्हेंबपर्यंत सेवेत आणण्याचे आव्हान आहे. तसेच नेमका कोणता भाग पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करायचा, याबाबत महापालिका प्रशासन संभ्रमात आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किनारा मार्ग प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाचे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन महाबोगद्यांपैकी दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचा क्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या प्रकल्पाचा काही भाग वर्षअखेरीस सुरू करावा, अशी सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा काही भाग नोव्हेंबपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे. मात्र कोणता भाग पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करायचा, यावर महापालिकेत खल सुरू आहे.

वरळी येथे पुलाच्या खांबांमधील अंतर वाढवून दिल्यामुळे हा मार्ग वांद्रे – वरळी सागरी सेतूला जोडण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मे २०२४ उजाडणार आहे. त्यामुळे नोव्हेंबपर्यंत केवळ हाजीअली किंवा वरळीपर्यंतच्या मार्गाची एकच बाजू सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत सागरी किनारा मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. हा प्रकल्प मोठा आणि गुंतागुंतीचा आहे. न्यायालयीन स्थगिती आणि टाळेबंदीमुळे त्याची अंतिम मुदत वारंवार वाढवण्यात आली होती. नंतर वरळी येथे पुलाच्या खांबांमधील अंतर वाढवून दिल्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी वाढला आहे.

या प्रकल्पांतर्गत प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या स्वराज्यभूमीजवळील ‘छोटी चौपाटी’पर्यंत दोन बोगदे तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम मेमध्ये पूर्ण झाले आहे. या बोगद्यातील अंतर्गत कामे अद्याप झालेली नाहीत. वरळीहून मरिन ड्राईव्हकडे येणाऱ्या मार्गावरील बोगद्याची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये हा मार्ग काही प्रमाणात सुरू झाल्यानंतर एकाच बाजूचा वापर करता येणार आहे. मरिन ड्राईव्हकडून वरळीकडे जाण्यासाठी जुन्याच रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.

मुंबई महापालिका संभ्रमात..

सागरी किनारा प्रकल्पाचा केवळ वरळीपर्यंतचाच भाग नोव्हेंबपर्यंत वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल. तसेच दोन समांतर बोगद्यांपैकी दक्षिण मुंबईकडे जाणारी बाजूच वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्की कोणता भाग वाहतुकीसाठी सुरू करायचा यावर अद्याप महापालिका प्रशासनाचा खल सुरू आहे. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97 %e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9
Show comments