मुंबई : परदेशी कंपनीशी साधर्म्य असलेला ई-मेल आयडी तयार करून अंधेरीतील कंपनीची सुमारे दीड कोटी रुपयांची सायबर फसणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने अंधेरीतील तक्रारदार कंपनीच्या अधिकाऱ्यांचेही ई-मेल हॅक केले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात तोतयागिरी करणे व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्कम जमा झालेल्या बँक खात्यांच्या माहितीद्वारे पोलीस तपास करीत आहेत. सायबर पोलिसही याप्रकरणी समांतर तपास करीत आहेत.
अंधेरी पश्चिम येथील कंपनीने याप्रकरणी अंबोली पोलिसांकडे नुकतीच तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी भारतीय न्याय संहिता कलम ३१९, ३१८ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ४३, ६६, ६६ (क) व ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार कंपनी रसायन क्षेत्रातील आहे. आरोपींनी ६ डिसेंबर २०२४ रोजी तक्रारदार कंपनीतील वरिष्ठ निर्यात व्यवस्थापक मंगला कामत व व्यवसाय विकास व्यवस्थापक अंगद सिंह यांचा अधिकृत ई-मेल हॅक केला. त्यानंतर या कंपनीची ग्राहक कंपनी असलेल्या इजिप्त कॅनेडियन कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला ई-मेल तयार केला. हॅक केलेल्या ई-मेद्वारे आरोपी परदेशी कंपनीबरोबर संपर्क साधायचा. बनावट ई-मेलद्वारे अंधेरीतील कंपनीशीही तो संपर्क साधत होता. अंधेरीतील कंपनीला इजिप्त कॅनेडियन कंपनीकडून एक लाख ५३ हजार ६०० अमेरिकन डॉलर्स (एक कोटी ३३ लाख सात हजार रुपये) येणार होते. त्याबाबत आरोपीने परदेशी कंपनीला ई-मेल पाठवून त्यावर स्वतःच्या बँक खात्यांचा क्रमांक पाठवला. त्यामुळे परदेशी कंपनीने त्या बँक खात्यांवर डिसेंबर महिन्यात एकूण एक कोटी ३३ लाख सात हजार रुपये जमा केले.
कंपनीने नुकतीच याप्रकरणी परदेशी कंपनीशी संपर्क साधला असता हा संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यामुळे अंधेरीतील रसायन कंपनीने याप्रकरणी अंबोली पोलसांकडे नुकतीच तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. परदेशी कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रक्कम जमा करण्यात आलेल्या बँक खात्यांबाबत माहिती मागवण्यात आली असून त्यानंतर पुढील तपास करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.