मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात १०,४९,२५१ वृद्धांवर उपचार करण्यात आले. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमांतर्गत वृद्ध रुग्णांना प्रादेशिक वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा केंद्र तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल करूनही उपचार करण्यात येत असून ही वृद्धापकाळ सेवा अधिक गतिमान करण्यात येणार आहे. प्रामुख्याने घरी असलेल्या व रुग्णालयात उपचारासाठी येऊ न शकणाऱ्या वृद्धांना घरीच आरोग्यसेवा मिळणे गरजेचे असून आगामी काळात यावर आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
वृद्धावस्थेत वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये आठवड्यातून एक दिवस जेरियॅट्रिक क्लिनिक चालविण्यात येते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून वृद्धलोकांच्या आरोग्याची शिबिरे घेऊन आरोग्य तपासणी केली जाते. यात वृद्धावस्थेतील विविध आरोग्य समस्यांचा विचार करून आरोग्य तयापसणी करण्यात येत असून त्यानंतर रुग्णांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या स्तरांवर उपचार केले जातात. अनेक प्रकरणात घरी जाऊन वृद्धांना आरोग्य सेवा देण्याची गरज असून ही अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे आरोग्य संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी सांगितले.
हेही वाचा >>>मुंबईः कर्ज देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सेवा केंद्रावर छापा; ७ जणांना अटक
या कार्यक्रमांतर्गत वृद्धांना प्राथमिक उपचाराच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक, निदानात्मक व उपचारांची सुविधा देणे, वृध्दांच्या आरोग्याच्या समस्या ओळखून त्यांचे निरसन करणे, वयोवृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबातील व्यक्तींना सक्षम बनविणे, आवश्यकतेनुसार वृद्ध रुग्णांना रिजनल जिरीअॅट्रीक सेंटर किंवा जिल्हा रुग्णालयासाठी संदर्भित करणे अशा सेवा पुरविल्या जातात. २००१च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे सात कोटी लोक हे ६० वयोगटावरील होते. म्हणजेच ७.७ टक्के लोकसंख्या साठीपुढील होती. २०११ साली हेचप्रमाण वाढून ८.९४ टक्के एवढे झाले. वर्षागणिक हे प्रमाण वाढत असून वृद्धापकाळातील असंसर्गजन्य आजारांचे प्रमाणही खूप मोठे असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्यामाध्यमातून राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य सुश्रुशा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात प्राथमिक उपचाराच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक व निदानात्मक उपचार करणे तसेच वृद्धांच्या विविध आरोग्य समस्या ओळखून उपचार करणे आणि गरजेनुसार विभागीय जेरियॅट्रिक केंद्रात किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येतात. यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात जिरीअॅट्रीक क्लिनीक आठवड्यातून एक दिवस चालवले जाते. जिल्हा रुग्णालयात वृद्ध रुग्णांसाठी १० खाटा (५ खाटा महिलांसाठी व ५ खाटा पुरुषांसाठी) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यांपैकी दोन खाटा अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>>मुंबई: भायखळा, देवनारची हवा खालावली
या कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत गेल्या वर्षी पावणेआठ लाख वृद्धांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी करण्यात आली, तर सुमारे पन्नास हजार वृद्ध रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. याशिवाय, साडेअठरा हजार वृद्ध रुग्णांना पुनर्वसनात्मक सेवा देण्यात आली तर दोन लाखांहून अधिक वृद्ध रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली. आडेआठ हजार वृद्धांना घरी जाऊन आरोग्य सेवा पुरविण्यात आली. राज्यात सन २०१०-११ पासून राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये २०१०-११ पासून, नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, सिंधुदुर्ग, नाशिक, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये २०१५-१६, अकोला, यवतमाळ, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, हिंगोली, कोल्हापूर, लातूर, रायगड, सातारा, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये २०१७-१८ पासून तर ठाणे, जळगांव, नागपूर, सोलापूर, सांगली, पालघर या जिल्ह्यांमध्ये २०१८-१९ पासून या कार्यक्रमानुसार वृद्धांना आरोग्य सेवा पुरविली जाते.
पहिल्या टप्प्यत वृद्धावस्थेतील आरोग्य समस्या समजून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात शिबीरांचे आयोजन केले जाते. येथे आवश्यकतेनुसार प्राथमिक स्तरावरील उपचार करण्यात येतात तसेच आवश्यकतेनुसार रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. वृद्धावस्थेतील लोकांच्या आरोग्य समस्या समजून घेण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पुणे व गडचिरोली या दोन जिल्हयांतील जिल्हा रुग्णालयांत १० खाटांचा स्वतंत्र जिरीअॅट्रिक वॉर्ड सुरु करण्यात येणार आहे. वृद्धापकाळातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी स्वतंत्रपणे अभ्यास करून आगामी काळात प्रभावी योजना राबविण्यात येतील असे आरोग्य संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी सांगितले.