लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी १० जणांविरोधात गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार व्यावसायिक असून त्यांना गुंतवणूकीवर ७० टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवले होते. याप्रकरणी गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा-पुणे, मुंबई, ठाण्यातील मतटक्का वाढविण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांची मदत
तक्रारदार मनोज सिंह(४४) अंधेरी पूर्व येथील रहिवासी असून त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारीनुसार सिंह यांना श्रीहरी कॉ सोसायटीचे सचिव नयनसिंह चौहान यांनी गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून ७ सप्टेंबर २०२३ मध्ये एक कोटी रुपये सहकारी सोसायटीच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. तसेच तक्रारदार यांनी सिंह यांच्या खासगी बँक खात्यावरही १० लाख रुपये जमा केले. ती रक्कम घेतल्यानंतर कोणताही परतावा न देता तक्रारदार यांची एक कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केली, अशी तक्रार गोरेगाव पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी सिंह यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.