महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी जळगाव जिल्ह्यातील एका गोदामावर छापा टाकून बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेल्या केटामाईन या औषधाचा १ हजार १७५ किलोचा साठा जप्त केला. या प्रकरणी विकास पुरी यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या केटामाईनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ११८ कोटी रुपये इतकी आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक पी. के. दास यांनी सांगितले की, देशाच्या पश्चिम विभाग संचालनालयातर्फे करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जळगाव येथे असलेल्या रुक्मा इंडस्ट्रीज्वर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. रुक्मा इंडस्ट्रीकडे या औषधाचे उत्पादन करण्याचा परवाना नसतानाही तेथे उत्पादन केले जात होते.
विकास पुरी याला शनिवारी पवई येथे अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून १ कोटी २ लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली असल्याचे समजते. पुरी याने औषधविज्ञानात एम.टेक केले आहे. विक्रोळी आणि रत्नागिरी येथे पुरी याच्या औषध आणि रसायन निर्मिती कंपन्याही आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा