कुलदीप घायवट, लोकसत्ता
मुंबई : उपनगरी रेल्वेगाड्यांतील वाढत्या प्रवाशांचा भार कमी करून प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी मध्य रेल्वेवर दहा जलद उपनगरी गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. सर्वाधिक गर्दीच्या दादर स्थानकातून कल्याणच्या दिशेने या फेऱ्या सुरू केल्या जातील.
मध्य रेल्वेवरील दादर स्थानकावरून तीन लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेला दादर स्थानक जोडलेले असल्याने, पश्चिम रेल्वेवरील प्रवासी प्रवास दादरवरून प्रवास करतात. प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करताना रेल्वे सुरक्षा विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दादर फलाट क्रमांक ८ च्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले. आता दादर फलाट क्रमांक १० आणि ११ वर लोकल टर्मिनल करण्याचे विचाराधीन आहे. तसेच फलाट क्रमांक १० – ११ चे ‘डबल डिस्चार्ज’ फलाटात रुपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकलमधून दोन्ही बाजूने चढता-उतरता येईल. तसेच कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकल चालवणे शक्य होणार आहे, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा-संस्कृतमध्ये पायाभरणी समारंभाची कोनशिला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते रेल्वे स्थानक विकास कार्यक्रम…
नव्या फेऱ्यांची शक्यता धूसर
सर्वसाधारण गाड्यांऐवजी ‘एसी’ गाड्या चालवण्यात येत आहेत. सध्या ६६ ‘एसी’ गाड्यांच्या फेऱ्या होत असल्याने गर्दी विभाजित होण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जादा सर्वसाधारण गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. परंतु, नव्या वेळापत्रकात एकही सर्वसाधारण गाड्यांची फेरी वाढविण्यात येणार नसल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. वंदे भारत एक्स्प्रेस, विशेष रेल्वेगाड्या, मर्यादित रेल्वे मार्गिकांमुळे जादा उपनगरी फेऱ्या सुरू होण्याची शक्यता धूसर आहे.
आणखी वाचा-मुंबई महानगरपालिका प्रशासन सेवानिवृत्त उपायुक्तावर मेहेरबान
कुर्ला लोकल रद्द होणार?
मध्य रेल्वेवरून सीएसएमटी-कुर्ला उपनगरी गाडीच्या फेऱ्या होतात. मात्र अनेकदा कुर्ला गाडी रद्द करण्यात येतात. परिणामी नव्या वेळापत्रकात कुर्ला गाडी रद्द करण्याचे नियोजन आहे. या गाडीचा विस्तार ठाण्याच्या दिशेने वाढवण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.
एकूण लोकल फेऱ्या – १,८१० फेऱ्या
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एकूण जलद लोकल – २७० फेऱ्या
यामधील १५ डबा जलद लोकल – २२ फेऱ्या
यामधील १२ डबा जलद लोकल – २४८ फेऱ्या
दादरवरून जलद लोकल वाढवण्याबाबत विचाराधीन आहे. -डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे