गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आली असून आता प्रतिदिन रुग्णसंख्या १०० हून कमी झाली आहे. परिणामी, मुंबईत करोना संसर्ग आटोक्यात आला असून मुंबईमधील सर्व जम्बो करोना केंद्र बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. या केंद्रांमधील सुमारे १७ हजार खाटा, त्याचबरोबर अन्य आरोग्य सुविधा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य, तसेच उपनगरीय रुग्णालयांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत गेली. दरम्यानच्या काळात टाळेबंदी लागू झाली. करोनाबाधित रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जम्बो करोना केंद्रे, करोना काळजी केंद्रे, करोना रुग्णालये आदी यंत्रणा उभी केली.

हेही वाचा >>> मुंबई : रेल्वे स्थानकांतील महिलांच्या विनयभंगाच्या घटनांची रेल्वेला डोकेदुखी

मुंबईत करोनाच्या एकामागून एक अशा तीन लाटा आल्या. मात्र तत्कालिन राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा उपलब्ध करून नागरिकांना दिलासा दिला. एप्रिलमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या ३० पर्यंत कमी झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा प्रतिदिन रुग्णसंख्या २५०० पर्यंत वाढत गेली होती. त्यानंतर जुलैमध्ये प्रतिदिन रुग्णसंख्या २५० पर्यंत नोंदविली गेली. दैनंदिन रुग्णसंख्येतील चढ-उतार सुरूच होता. गणेशोत्सव जवळ येत होता. मात्र ऑगस्टमध्ये प्रतिदिन रुग्णसंख्या ७०० ते एक हजाराच्या दरम्यान होती. मात्र सध्या प्रतिदिन रुग्णसंख्या १०० हून कमी आहे.
मुंबईत आजघडीला ८०५ सक्रिय रुग्ण असून त्यापैकी ६८४ रुग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. ११७ रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आढळली असून चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधी ७०९९ दिवसांवर पोहोचला असून रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९८.२ टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच रुग्णवाढीचे प्रमाण ०.०२३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : मराठी चित्रपटाला पुन्हा एकदा यश ; ‘बॉईज ३’ची पहिल्या आठवड्यात ४.९६ कोटी रुपयांची कमाई

दहिसर चेक नाका, कांदरपाडा (७०० खाटा), मालाड जम्बो करोना केंद्र (२२००), नेस्को गोरेगाव टप्पा १ (२२२१), नेस्को गोरगाव टप्पा २ (१५००), बीकेसी करोना केंद्र (२३२८), कांजूरमार्ग करोना केंद्र (२०००), शीव जम्बो करोना केंद्र (१५००), आरसी भायखळा केंद्र (१०००), आरसी मुलुंड जम्बो केंद्र (१७०८), सेव्हन हिल्स रुग्णालय – अंधेरी (१८५०) येथील तब्बल १७००७ खाटा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य आणि उपनगरीय रुग्णालयांना उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बंद करण्यात येणाऱ्या जम्बो करोना केंद्रातील अन्य आरोग्यविषयक सुविधाही या रुग्णालयांना उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 jumbo corona centers in mumbai closed due to corona infection mumbai print news amy