मुंबई : दक्षिण आफ्रिकेला पर्यटनासाठी पाठवण्याच्या नावाखाली १० जणांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीविरोधात कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी कांदिवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा – गिरगावमध्ये सायकलवरून झालेल्या वादातून हत्या
हेही वाचा – अंधेरीत गॅसगळतीमुळे दुकानांना आग, चारजण जखमी
तक्रारदार जेसल शहा (४६) हे कांदिवली पश्चिम येथील रहिवासी आहे. जेसल शहा आणि इतर नऊ जणांना दक्षिण आफ्रिकेला पर्यटनाला जायचे होते. त्यासाठी डिसेंबर महिन्यात आरोपी तेजस शहा याने ट्रॅव्हल्स एजन्सीच्या माध्यमातून स्वस्तात आफ्रिकेला नेण्याचे त्यांना आश्वासन दिले होते. आरोपीने तक्रारदार व इतर नऊ जणांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे सर्वांनी १३ डिसेंबर, २०२३ ते १२ फेब्रुवारी, २०२४ या कालवधीत २० लाख ४१ हजार ५०० रुपये भरले. पण त्यानंतरही सर्वांना दक्षिण आफ्रिकेला नेण्यात आले नाही. तसेच त्यांची घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. वारंवार मागणी केल्यानंतर अखेर तक्रारदाराने याप्रकरणी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.