मुंबई: एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यांपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यावेळी २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने शुक्रवारी दिली. ही भाडेवाड ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे.
ही भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू असेल. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू नाही, अशी माहिती महामंडळाने दिली. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे , त्या प्रवाशाकडून वाहक आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक वसूल करण्यात येणार आहे. ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास, तसेच मासिक आणि त्रैमासिक तसेच विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेबरपासून नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जाणार आहे.
एसटी भाडेवाढीचा तक्ता
मार्ग साधी निमआराम (दर रुपयांमध्ये)
सध्या प्रस्तावित सध्या प्रस्तावित
दादर ते स्वारगेट २३५ २६० ३२० ३५५
मुंबई-अलिबाग १६० १७५ २१५ २३५
बोरीवली-रत्नागिरी ५५० ६०५ ७४५ ८२५
मुंबई-कोल्हापूर ५६५ ६२५ ७७० ८५०
मुंबई-औरंगाबाद ८६० रु ९५० रु १,१७० रु १,२९५ रु
शिवशाही बसचेही दर वाढले असून दादर ते स्वारगेटचे सध्याचे ३५० रुपये असलेले भाडे ३८५ रुपये, तर मुंबई-औरंगाबादचे तिकीट दर १ हजार २८० रुपयांवरून १ हजार ४१० रुपये आणि बोरिवली-रत्नागिरी मार्गावरील ८१५ रुपयांवरून ९०० रुपये दर होणार आहेत.