लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: संपूर्ण मुंबईत उद्या सोमवारपासून १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. सोमवार दिनांक २० नोव्हेंबर ते शनिवार दिनांक २ डिसेंबर असे तेरा दिवस ही पाणी कपात असेल. त्यामुळे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मुंबई महापालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तातडीच्या दुरुस्ती कामामुळे २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत मुंबई महानगरात तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत संभ्रम; कर्मचाऱ्यांची दिनचर्या बदलण्याची भीती
मुंबई महानगरातील सर्व विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी कपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केली आहे.