‘इंडियन ग्रीन बिल्डींग काऊन्सिल’ने (आयजीबीसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘दहिसर-अंधेरी पूर्व मेट्रो ७’ मार्गिकेतील १० मेट्रो स्थानकांना पर्यावरणपूरक आणि प्रवासीस्नेही मेट्रो स्थानके म्हणून गौरविले आहे. ‘आयजीबीसी’ने या १० स्थानकांना प्लॅटिनम मानांकन दिले असून यानिमित्ताने एमएमआरडीएच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हेही वाचा- १२ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला अटक
‘दहिसर – अंधेरी पूर्व मेट्रो ७’मधील पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. तर दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा टप्पा सेवेत दाखल होईल. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणारा आणि दहिसर – अंधेरी प्रवास अतिजलद, सुकर करणारा हा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या मार्गिकेतील १० मेट्रो स्थानकांचा सुंदर, पर्यावरणपूरक आणि प्रवासीस्नेही स्थानके म्हणून गौरव करण्यात आला आहे.
हेही वाचा- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला स्थान मिळणार का?
जोगेश्वरी पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान आणि ओवरीपाडा या १० स्थानकांचा त्यात समावेश आहे. पर्यावरणविषयक नियम लक्षात घेऊनच या स्थानकांचे बांधकाम करण्यात आले असून स्थानकांची रचनाही पर्यावरणपूरक आहे. तसेच प्रवासी, अपंगांच्या सोयी-सुविधांवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या सर्व बाबी विचारात घेऊन आयजीबीसीने या १० मेट्रो स्थांनकांना प्लॅटिनम मानांकनाने गौरविले आहे.