मुंबईकरांचा प्रवास सुखाचा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एमयूटीपी-३ प्रकल्पासाठी १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी लवकरच उभारण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केले आहे. याबाबतचा प्रस्ताव नीती आयोगाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला असून मंजूरी मिळताच हा प्रस्ताव कॅबिनेटच्या बठकीत मांडण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
बोरिवली रेल्वे स्थानकात सरकते जिने व पादचारी पूलाचे उद्घाटन सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
एमयूटीपी-३ अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या उन्नत मार्गासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार यांची संयुक्त भागीदारी असलेली कंपनी स्थापन करण्यात येणार असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. यात निविदा प्रक्रियेतील मंजूरीचे अधिकार रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय व्यस्थापक यांना देण्यात येणार आहेत. तर काही कामांच्या मंजूरीसाठीचे अधिकार स्टेशन मास्तरांना देणार असल्याची घोषणा प्रभू यांनी सांगितले.