विकासासाठी मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रातील जंगले आणि झाडे नष्ट केली जात असून त्याचा परिणाम पर्यावरण संतुलनावरही झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी होण्यास बेसुमार जंगलतोड आणि झाडांचा नाश हे ही एक  प्रमुख कारण ठरले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली असून येत्या काही वर्षांत महाराष्ट्र हिरवागार करून १०० कोटी झाडे लावण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी जाहीर केला.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. राज्य शासनाचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वसुंधरा पुरस्कार व लघुचित्रपट स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या वेळी चव्हाण यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात येत्या काही वर्षांत  १०० कोटी झाडे लावण्यात येणार असून या महत्वाकांक्षी कार्यक्रमात राज्य शासन, राज्य शासनाचे विविध विभाग यांच्याबरोबरच नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. ही रोपे तयार झाली असून शाळा, महाविद्यालये, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, राज्यातील विविध सार्वजिनक ठिकाणे, राज्य व राष्ट्रीय महामार्ग, लहान-मोठे रस्ते आदी ठिकाणी ही रोपे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. ही झाडे जगविण्यासाठी लावण्यात आलेल्या या झाडांना टॅंकरने पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी टॅंकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्याच्या लहान-मोठय़ा गावातील तलाव, सरोवरे, ओढे आणि नदीतील प्रदूषण व त्यावर होणारी अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे याविषयी चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील काही तलावांमधील गाळ साफ केल्यामुळे या तलावांच्या पाणी साठवणूक क्षमतेत काही दशलक्ष लिटर्सने वाढ झाली आहे. कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात येणारी धरणे/कालवे यांच्या खर्चाच्या तुलनेत हा खर्च कमी आहे.त्यामुळे संपूर्ण राज्यातील तलाव, सरोवरे, नद्या यातील गाळ काढण्याचा तसेच अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे हटविण्यात येणार असल्याची घोषणाही चव्हाण यांनी केली.
वसुंधरा पुरस्कार स्पर्धेतील विजेत्यांना महेंद्रा व्हेईकल्स प्रा. लिमिटेड (प्रथम), केएसओ पंप्स (द्वितीय) व लॉरेल इंडिया (तृतीय) या वेळी पुरस्कार वितरित करण्यात आले. महानगरपालिका आणि नगरपालिकेसाठीचा पुरस्कार अनुक्रमे पुणे व महाबळेश्वर नगरपालिकेला देण्यात आला. लघुचित्रपट स्पर्धेत हौशी गटात किरण जोशी (प्रथम), विलास कुंभार (द्वितीय) आणि संतोष देवधर (तृतीय) तर व्यावसायिक गटात सुरेश जगताप (प्रथम), विलास काणे (द्वितीय) आणि मयुर कुलकर्णी (तृतीय) यांना गौरविण्यात आले. शेकरू महोत्सव, दृष्टीवेध २०-२०, सृष्टीमित्रांची संकलिका या पुस्तकांचे प्रकाशनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.