मुंबई : जनतेला सकस, निर्भेळ अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने १०० दिवसांचा कृती आराखडा सक्षमपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यामध्ये दूध व दूग्धजन्य पदार्थ तपासणी मोहीम, अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेचे प्रशिक्षण, हॉटेल, रेस्टॉरंट यांना स्वच्छता मानांकन, इट राईट कॅम्पस प्रमाणीकरण व धार्मिक स्थळांमध्ये ईट राईट प्रार्थनास्थळ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत नागरिकांना चांगले अन्नपदार्थ मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेबाबतचे निशुल्क प्रशिक्षण देऊन त्यांना ‘अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीटमार्ट, बेकरी शॉप, मटन दुकाने यांची तपासणी करून अन्न सुरक्षेचे निकष पूर्ण करणाऱ्यांना गुणांकनानुसार स्वच्छता मानांकन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सरकारी, निमसरकारी, खाजगी आस्थापना, महाविद्यालये, विदयापीठे इत्यादी ठिकाणी कार्मचाऱ्यांसाठी व अभ्यांगतांसाठी ईट राईट कॅम्पस मोहीम राबवून अन्न सुरक्षेची खात्री करण्यात येणार आहे. मंदिरांमधील प्रसाद, गुरुद्वारामधील लंगर व अन्य धार्मिक स्थळांवरील प्रसाद, अन्नपदार्थांची दर्जात्मक तपासणी करून सर्व धार्मिक स्थळांना ईट राईट प्लेस ऑफ वरशीप हे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा – मुंबई : नायर रुग्णालयातील रोजंदारी कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित, ७४ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
या उपक्रमांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधील सहा हजार अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेचे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य असून, एक हजार अन्न अस्थापनांचे स्वच्छता मानांकन करण्याचे लक्ष्य अन्न व औषध प्रशासानाने ठेवले आहे. त्याचबरोबरच ४० सरकारी, निमसरकारी आस्थापनांमध्ये ईट राईट कॅम्पस निश्चित करण्यात येणार आहेत. या पाच जिल्ह्यांमधील १० महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना प्रथम टप्प्यात ईट राईट प्लेस ऑफ वरशीप हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. धार्मिक स्थळांवर भक्तांना मिळणार प्रसाद हा योग्य असेल याची खात्री करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांनी सांगितले.
हेही वाचा – सैफवर हल्ला प्रकरण : आरोपी शरिफुलचा बांगलादेशातील चालक परवाना पोलिसांच्या हाती
जनसहभागातून अन्न सुरक्षेचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी परवाना घेऊनच व्यवसाय करावा, स्वच्छता मानांकन प्रमाणपत्र, ईट राईट परिसर, ईट राईट प्लेस ऑफ वरशीपसाठी संबंधित जिल्हातील सहायक आयुक्त (अन्न) कार्यालयाशी संपर्क साधावा. – श्रीकांत करकळे, सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, कोकण विभाग