मुंबई : मुंबई ते नवी मुंबई अंतर २० ते २२ मिनिटांत पार करणारा मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात अटल सेतू प्रकल्पाचे शुक्रवारी लोकार्पण झाल्यानंतर तो सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या सागरी सेतूवरून वाहनचालकांना ताशी १०० किमी वेगाने वाहने चालविता येणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा अर्थात इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या अंतर्गत या सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे ४०० कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने या कॅमेऱ्यात काही सेकंदात कैद होणार आहेत.

हेही वाचा…अटल सेतूवरील वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे

अशा वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हा सेतू वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर यावरून दिवसाला ७० हजार वाहने धावतील, असा दावा केला जात आहे.अटल सेतूचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

सर्वसामान्यांसाठी हा सागरी सेतू शनिवारपासून खुला होण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा लोकार्पणाच्या आधी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या महामार्गाची रचना ताशी १०० किमी वेगमर्यादेनुसार करण्यात आली आहे.

हेही वाचामुंबई: १८ हजार कोटींच्या ‘अटल सेतू’ची पहिली झलक; मोदींनी दाखवला भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचा Video

पूर्वी महामार्गावरून ताशी ८० किमी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. आता सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होत असताना एमएमआरडीएने ताशी १०० किमी अशी वेगमर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार या सागरी सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणेअंतर्गत २१.८० किमीदरम्यान सुमारे ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात १३० हाय डेफिनिशन पीटीझेड कॅमेरे, १९० आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित थर्मल कॅमेरे, ३६ अंडर ब्रिज कॅमेरे, १२ सेक्शन स्पीड आणि २२ स्पॉट स्पीड कॅमेरे यांचा समावेश आहे. त्यामुळे सागरी सेतूवरील प्रवास सुरक्षित होणार असल्याचेही एमएमआरडीएने सांगितले.

हेही वाचालोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी पोस्ट खात्याने घेतला महत्त्वाचा निर्णय

इंधन आणि वेळेची मोठी बचत

सागरी सेतूवरून मुंबई ते चिर्ले अंतर २० ते २२ मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र यासाठी हलक्या वाहनचालकांना २५० रुपये असा पथकर एकेरी प्रवासासाठी मोजावा लागणार आहे. हा पथकर अधिक असल्याचे म्हटले जात असले तरी या सागरी सेतूमुळे इंधन आणि वेळेची मोठी बचत होणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 km per hour speed limit on atal setu 400 cameras will monitor the vehicles mumbai print news psg
Show comments